गुरुवार, जून २३, २०११

शिवशक्ती-भीमशक्ती भाग ३- कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे बेगडी दलीतप्रेम

रामदास आठवले यांनी शिवसेनेचे धनुष्य खांद्यावर घेतल्यापासून त्यांच्यावर टीकेचा भडीमार सुरु झाला. शिवसेना कशी जातीयवादी आहे आणि त्यांना बाबासाहेबांच्या विचारांची कशी अलर्जी आहे याचा लेखाजोखा सारेजण मांडत आहेत. ज्यांच्या स्वार्थी राजकारणाला कंटाळून आठवले सेनेसोबत गेले त्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीनेही आठवले आणि सेना या दोघांना टीकेचे लक्ष बनवले आहे. आठवलेंचे सेनेसोबत जाणे हा बाबासाहेबांच्या विचारांचा अपमान आहे, आठवले बाबासाहेबांचा विचार विसरले अशा प्रकारची मांडणी सत्ताधाऱ्यांनी सुरु केली. मुळात सत्ताधाऱ्यांना आठवलेंच्या या भूमिकेवर बोलण्याचा अधिकार आहे का तेही तपासून पाहायला हवे.
 

आठवले सेनेसोबत जाणार हे स्पष्ट होताच कॉंग्रेस-राष्ट्रवादीने आपले डावपेच खेळण्यास सुरुवात केली. राष्ट्रवादीने सामाजिक हक्क परिषद भरवून आम्हीच दलित मागास जनतेचे कैवारी आहोत असा डांगोरा पिटण्यास सुरुवात केली. त्यातूनच मग दादर स्टेशनचे नामकरण चैत्यभूमी किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे करावे ही मागणी केली. कॉंग्रेसने ही मागणी आमचीच असल्याचे सांगून या स्पर्धेत आपणही असल्याचे स्पष्ट केले. वास्तविक पाहता या दोन्ही पक्षांना दलित मागास समाजाचा किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुळका आत्ताच का यावा ? हा प्रश्न पडतो. जेव्हा खैरलांजीसारखे देशाला काळीमा फासणारे दुर्दैवी हत्याकांड झाले तेव्हा हीच सत्ताधारी मंडळी मुग गिळून शांत बसली होती. त्यावेळी मात्र त्यांनी कमालीची उदासीनता दाखवली. म्हणजे जिथे दलित-मागास समाजावर प्रत्यक्ष अन्याय-अत्याचार होतात तिथे काहीच कृती करायची नाही. दोषी व्यक्तींवर कारवाई व्हावी म्हणून प्रयत्न करायचे नाहीत आणि आम्हीच दलितांचे खरे तारणहार आहोत असा भ्रम निर्माण करायचा ही सत्ताधाऱ्यांची दुटप्पी वृत्ती आहे. खैरलांजी प्रकरणाची दखल घ्यायला पूर्ण एक महिना जावा लागला. जेव्हा आंबेडकरी जनतेतून प्रक्षोभ निर्माण झाला तेव्हा सत्ताधारी खडबडून जागे झाले. म्हणजे एकूणच दलित वर्गाबद्दल सत्ताधाऱ्यांना आस्था आहे असे कधी जाणवलेच नाही.
 अशी सर्व परिस्थिती असताना दादरचे नामांतर वगैरे भावनिक गोष्टी समाजासमोर मांडून आपणालाच दलित-मागासांचा कसा कळवळा आहे हे दाखवण्याची सत्ताधारी पक्षांची चढाओढ चालू आहे. नामांतर प्रश्नी बोलायचे तर दादरचे राहू द्या, सत्ताधारी पक्षातील बहुतांशी राजकीय नेत्यांच्या शैक्षणिक, सहकारी, सामाजिक संस्था आहेत, त्यांना डॉ. बाबासाहेबांचे नाव देण्याचे धाडस त्यांनी दाखवावे. मगच त्यांचे खरे दलित प्रेम दिसून येईल. स्वतःच्या मालकीच्या संस्थाना आपल्या वाडवडीलांची नवे द्यायची आणि समाजात मात्र काही वस्तू, ठिकाणे यांना डॉ. बाबासाहेबांचे नाव द्यावे अशी मागणी करायची. परंतु त्यासाठी संघर्ष मात्र दलित जनतेलाच करायला लावायचा अशी सत्ताधाऱ्यांची नीती आहे.
आजपर्यंत मागास समाजासाठी जे-जे करता येणं शक्य आहे तेसुद्धा सत्ताधारी नीटपणे करू शकले नाहीत. मागास समाजाच्या शिक्षण, आरोग्य यासाठी काही योजना आखून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी असे त्यांना कधी वाटत नाही. मागासांच्या खऱ्या प्रश्नावर सरकार अतिशय उदासीन आहे. दलितांवरील अत्याचार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. त्यातील किती दोषींवर कारवाई होते ? सत्ताधारी म्हणून या पक्षांची काय जबाबदारी आहे कि नाही ? परंतु आपली जबाबदारी विसरून हे दलित मतांच्या मागे लागले आहेत. त्यांना दलितांचा उत्कर्ष नकोय. त्यासाठी काहीतरी सकारात्मक करण्याची इच्छाशक्ती नाही. मात्र दलित जनतेने आंधळेपणाने आपणालाच मते द्यावीत हा यांचा अट्टाहास असतो.
रामदास आठवले सत्तेसाठी शिवसेनेसोबत जात आहेत अशी टीका सत्ताधाऱ्यांकडून नेहमी होत असते. राजकीय पक्षांनी सत्ताप्राप्तीसाठी प्रयत्न करणे गैर नाही. आठवले जेव्हा सत्ताधारी पक्षांसोबत होते तेव्हा आठवलेंना सत्तेतील ठरलेला १० % वाटा का दिला नाही ? एखादे मंत्रीपद दिले म्हणून उपकार केले काय ? शिर्डीसारख्या सत्ताधारी पक्षांची ताकद असणाऱ्या मतदारसंघात आठवलेंचा पराभव होतो हे कशाचे निदर्शक आहे ? डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, “कॉंग्रेस हे जळते घर आहे.” म्हणजे बाबासाहेबांचा कॉंग्रेसच्या फसव्या राजकारणाला स्पष्ट विरोध होता. तरीही आठवले कॉंग्रेससोबत होतेच ना ? काँग्रसने विविध राज्यात ज्या प्रादेशिक पक्षांसोबत युती किंवा आघाडी केली त्यांची आज काय अवस्था आहे हे सर्वांना माहित आहे. कॉंग्रेसने नेहमी धूर्त चाली खेळून आपण दलित-मागास-आदिवासींचे तारणहार आहोत अशी प्रतिमा निर्माण केली. जनतेला नेहमी भावनिक आवाहने करत सत्तेचे डावपेच खेळले. कॉंग्रेसपासून वेगळे होवून दुसरी चूल मांडणारी राष्ट्रवादीही सत्तेच्या या डावपेचात कमी नाही. आजवर या पक्षांनी दलित-मागास समाजाची भरपूर फसवणूक केली. या पक्षांमध्ये असणाऱ्या धनदांडग्या लोकांनाच हे पक्ष पोसत आहेत. हे लोक कधीही डॉ. बाबासाहेबांच्या विचारानुसार वाटचाल करत नाहीत. सत्तेसाठी डॉ. बाबासाहेब आणि दलित समाज वापरले जातात. त्यामुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादी दलित मागासांना सन्मान देवू शकत नाहीत हे उघड आहे. या पक्षांचे दलितप्रेम बेगडी आहे याची जाणीव सर्व दलित समाजाला झाली आहे.

3 टिप्पणी(ण्या):

अनामित म्हणाले...

"बारोबर आहे सर" आठवले म्हणजे संपूर्ण भीमशक्ति नाही

rahul bhingardeo म्हणाले...

"बारोबर आहे सर" आठवले म्हणजे संपूर्ण भीमशक्ति नाही......

अनामित म्हणाले...

MALA ASE WATATE KI SHIVSENA HA OBC PUSH AHE.WA ATA DALIT

BANDHU TYANA MILALE AHET.APAN ASHI ASHA KARU KI RAJYAT

EK OBC/DALIT YANI BANLELE SARKAR SATTEWAR YEIL ANI LABAD

SAKHAR ANI SHIKSHAN SAMRATANA HAKLUN DEIL.

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes