शनिवार, मे १४, २०११

मनातल्या भूताला नैवेद्य... नातवाच्या रक्ताचा!

श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये फरक आहे; पण धोंडेवाडी, ता. कराड, जि. सातारा येथील काकडे कुटुंबीयांना ही तफावत ओळखताच आली नाही. वादळी वाऱ्यात घरावरील पत्रे उडाले, तरी कोणीतरी 'करणी'च केली, असा समज करून घेऊन हे कुटब देव-देवऋषाच्या मागे धावायचं. करणी, भानामती, मीठ-मिरच्या, लिबू, काळी बाहुली असा खेळ हे कुटब खेळत असे. या खेळातच अखेर चार वर्षांच्या प्रणवचा हकनाक बळी गेला. ज्यांच्या अंगा-खांद्यावर खेळून बालपण व्यतीत करायचं त्याच आजी-आजोबानं प्रणवचा गळा दाबला. आजी-आजोबाच्या या 'करणी'मुळे निरागस प्रणवच्या आयुष्याचा मात्र दुर्दैवी अंत झाला. 


दुर्दैवी प्रणव काकडे
काही दिवसांपूर्वी कराड तालुक्याला वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. अनेक ठिकाणी झाडे मोडून पडली. कराड-ढेबेवाडी मार्गावर तर दोन किलोमीटरच्या अंतरात तब्बल पंचवीस झाडे जमीनदोस्त झाली. विजेच्या तारा तुटल्या, खांब कोलमडले, पिके भुईसपाट झाली. याच वादळात शेकडो घरांवरचं छतही उडालं. धोंडेवाडी येथील काकडे कुटबीयांच्या घरावरील पत्रेही वाऱ्याने उडाले. वास्तविक, ही एक नैसर्गिक आपत्ती होती. प्रत्येकजण वादळ ही आपत्ती समजून उदध्वस्त घरटं सावरण्याच्या प्रयत्नात होता; पण त्याचवेळी काकडे कुटुंबीयांच्या डोक्यात मात्र वेगळेच विचार घुटमळत होते. 'आमच्याच घरावरचा पत्रा का उडाला,' या एकाच प्रश्नानं या कुटुंबातील काही जणांच्या मनात घर केलं होतं. विमल, नर्मदा आणि तानाजी काकडे हे तिघेजण या कुटुंबातील बुजूर्ग. अनेक पावसाळे पाहिलेले; पण जसा घरावरचा पत्रा उडाला तसा या तिघांच्याही काळजाचा ठोका चुकला. कुणीतरी 'करणी' केली, या विचारानेच या तिघांचीही अनेक दिवस घालमेल होत होती. यापूर्वीही त्यांची अंधश्रद्धा सर्वांसमोर आली होती. गावातील मोकाट कुत्र्यांनी काही महिन्यांपूर्वी शेळीवर हल्ला केला. त्यावेळी 'आमच्याच शेळीवर हल्ला का केला,' असाही प्रश्न त्या तिघांना सतावत होता. तसे त्यांनी काहीजणांना बोलूनही दाखवलं होतं. विमल, नर्मदा आणि तानाजी हे तिघेजण भुता-खेतांवर, भानामती, करणीवर प्रचंड विश्वास ठेवत. तसेच देवऋषावरही त्यांची श्रद्धा होती. 

घरावर कोणतंही संकट आलं की हे तिघेजण देवऋषांच्या घराची वाट धरायचे. तो सांगेल तसा उतारा हे ठेवायचे. त्यातूनच समाधान मिळवायचे; पण त्यांची ही अंधश्रद्धा चार वर्षांच्या प्रणवच्या जिवावर बेतली. काकडे यांच्या घरात काही दिवसांपासून विचित्र घटना घडायच्या; मात्र त्या घटना म्हणजे निव्वळ अंधश्रद्धेचा कळस होता, असं पोलिसांचं मत आहे. प्रणव व त्याची दीड वर्षाची चुलतबहीण सानिका हे दोघेजण खेळायला गेल्यानंतर सानिकाचा मळवट भरल्याचं दिसून येत होतं. सानिका घरी येईल त्यावेळी तिच्या कपाळावर कुंकू लावण्यात आलेलं दिसायचं. हा प्रकार करणी-भानामतीचा आहे, असं भासविण्याचा प्रयत्न होत होता; पण ज्या-ज्या वेळी सानिकाचा मळवट भरल्याचं निदर्शनास यायचं, त्या-त्या वेळी सानिकाची आजी विमल तिच्यासोबत असायची. तीच सानिकाला घरात घेऊन यायची आणि घरातल्या सर्वांना सानिकाचं कपाळ दाखवून तिचा कोणीतरी मळवट भरला असल्याचं सांगायची. विमल अंधश्रद्धाळू असल्यामुळं तीच सानिकाचा मळवट भरत असावी, असा पोलिसांचा कयास आहे. तसेच घराच्या साठवण टाकीतही तीच हळद-कुंकू टाकत असावी, ज्यामुळे पाण्याचा रंग बदलायचा आणि पाहणाऱ्या प्रत्येकाला तो एक 'चमत्कार' वाटायचा. काकडे यांच्या घरात दररोज असंच काही ना काही घडत राहायचं, असं त्यांचे शेजारी सांगतात. 

दररोज नवीन प्रकार, नवीन चमत्कार या घरात दाखविले जायचे. ते प्रकार कोण आणि कशासाठी करत होतं, हे अद्याप निष्पन्न झालेलं नसलं तरी आजपर्यंत घडलेल्या घटना कपोलकल्पित आणि जाणीवपूर्वक घडवून आणलेल्या आहेत, असं पोलिसांचं ठाम मत बनलंय. प्रणवच्या बाबतीत नेमकं काय झालं, त्याचा खून कशासाठी करण्यात आला, या निष्कर्षाप्रत तपास पोहोचलेला नाही; मात्र सख्खी आजी विमल, चुलत आजी नर्मदा आणि चुलत आजोबा तानाजी काकडे यांनीच त्याचा खून केल्याचं तपासात स्पष्ट झालं आहे. विमल, नर्मदा यांच्यासह काकडे कुटुंबातील बहुतांश जण अल्पशिक्षित आहेत, त्यामुळंच या घरातील काहीजणांवर अंधश्रद्धेचा मोठा पगडा आहे.

अंधश्रद्धांचे  समाजातून समूळ उच्चाटन व्हावे म्हणून अंधश्रद्धा निर्मुलन समिती डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि डॉ. एन. डी. पाटील  यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे. अंधाश्राद्धा निर्मुलन समितीची जाहीर सभा धोंडेवाडी, ता. कराड, सातारा येथे २० मे २०११ रोजी आयोजित करण्यात आली आहे.

1 टिप्पणी(ण्या):

Anmol Sawant म्हणाले...

पुरोगामी महाराष्ट्रात अशा अंधश्रद्धांचे प्रकार म्हणजे माणुसकीला काळीमा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes