बुधवार, मे ०४, २०११

डॉ. आ. ह. साळुंखे

स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्रातील बदलत्या सामाजिक-सांस्कृतिक जाणिवांवर मूलभूत चिंतन करणाऱ्या, हाताच्या बोटांवर मोजता येणाऱ्या विचारवंतांमध्ये डॉ. आ. ह. साळुंखे यांचे नाव घ्यावेच लागते. महाराष्ट्राच्या भविष्याबाबत त्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केलेले सांस्कृतिक धोरण थोरामोठय़ांकडून वाखाणले गेले. सांगली जिल्हय़ात खाडेवाडीसारख्या छोटय़ा गावात १९४३ मध्ये शेतकरी कुटुंबात साळुंखे जन्माले. आयुष्यभर नांगर ओढत, पाण्याच्या पखाली वाहण्याचेच काम करावे लागता कामा नये याची पक्की जाणीव आ. ह. साळुंखे यांना असली पाहिजे; डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध ही त्यांची केवळ दैवते नव्हती, 
तर त्यांच्या विचारांची आणि त्यासाठी झालेल्या सामाजिक प्रवासाची त्यांना अगदी लहान वयातच ओढ लागलेली होती. संत तुकारामांच्या बंडखोर विचारांना समाजाने कसे अलगद उचलले आणि त्यांच्या बंडखोरीलाही कशी समाजमान्यता मिळाली, याचा अनुभव डॉ. आ. ह. साळुंखे यांना लहान वयातच आला. 

भारतीय संस्कृतीबद्दलची जिज्ञासा पुरी करण्यासाठी केवळ समाजविज्ञानाच्या अंगाने जाता कामा नये, त्यासाठी साहित्याची उपासना महत्त्वाची आहे, याचे भान ठेवत, साळुंखे यांनी शिवाजी विद्यापीठात बी.ए.च्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना संस्कृत विषय ‘स्पेशल’ला घेतला होता. या परीक्षेत ते विद्यापीठात प्रथम आले. एम. ए. च्या परीक्षेतही त्यांनी संस्कृत आणि मराठी या विषयांत स्वतंत्ररीत्या प्रावीण्य मिळवले. संस्कृत आवडीचा विषय असल्याने ‘चार्वाक दर्शनाचा चिकित्सक अभ्यास’ या विषयात संशोधन करून त्यांनी पीएच.डी. ही संपादन केली. शिवाजी विद्यापीठाच्या संस्कृत अभ्यास मंडळाचे अध्यक्ष, वाङ्मय विद्याशाखेचे अधिष्ठाता या नात्याने डॉ. साळुंखे यांनी संस्कृत आणि मराठी भाषेच्या अध्यापनाच्या क्षेत्रात बत्तीस वर्षे केलेली उल्लेखनीय कामगिरी जेवढी महत्त्वाची तेवढीच, कदाचित काकणभर सरस असलेली त्यांची ग्रंथसंपदा आहे. 

महाराष्ट्राला पहिल्यापासूनच नवनव्या विचारांचे आकर्षण राहिलेले आहे. वैचारिक प्रबोधनाच्या क्षेत्रात महाराष्ट्र सतत आघाडीवर राहिला. संत तुकाराम, संत चोखामेळा, संत सावतामाळी यांच्यासारख्या आधुनिकतेला स्पर्श करणाऱ्या विचारवंत संतपरंपरेनंतर महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. आंबेडकर अशी एक वैचारिक परंपरा महाराष्ट्रात निर्माण झाली आणि तिच्यावर पालनपोषण झालेले अनेक विचारवंत त्या विचारांमध्ये स्वत:ची भर घालून नवा सिद्धान्त मांडण्याचा प्रयत्न करत असतात. डॉ. साळुंखे यांचे या क्षेत्रातील कार्य अत्यंत मौलिक स्वरूपाचे आहे. 

समाजाला विचारप्रवृत्त करून योग्य त्या मार्गापर्यंत नेण्यासाठी सातत्याने समाजाचा आणि त्यातील आडव्या-उभ्या धाग्यांच्या विणीचा अभ्यास करणाऱ्या मोजक्या विचारवंतांमध्ये डॉ. साळुंखे यांचे नाव यासाठीच घ्यावे लागते. ‘गुलामांचा आणि गुलाम करणाऱ्यांचा धर्म’, ‘सर्वोत्तम भूमिपुत्र- गौतम बुद्ध’, ‘बळीवंश’, ‘तुळशीचे लग्न : एक समीक्षा’, ‘विद्रोही तुकाराम : समीक्षेची समीक्षा’, ‘आस्तिकशिरोमणी चार्वाक’, ‘धर्म की धर्मापलीकडे’, ‘म. फुले आणि धर्म’, ‘मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती’ अशी त्यांच्या ग्रंथांची शीर्षके जरी पाहिली, तरीही त्यांच्या वैचारिक क्षेत्रातील विस्तृत कामगिरीचा अंदाज येतो. तीसहून अधिक संख्येने प्रकाशित झालेली त्यांची ग्रंथसंपदा म्हणजे महाराष्ट्राच्या सामाजिक घडामोडींच्या इतिहासाचा आढावाच आहे.

आपण चळवळीत राहावे आणि त्यातून समाजप्रबोधन करावे, अशी ऊर्मी डॉ. साळुंखे यांनाही होणे स्वाभाविक होते.  प्रखर बुद्धिमत्ता आणि त्याची साक्षेपी मांडणी करणाऱ्या आ. ह. साळुंखे यांनी लिहिलेल्या ‘तुझ्यासह आणि तुझ्याविना’ या एका अप्रतिम ललित लेखनाचा उल्लेख अपरिहार्य आहे. पती-पत्नीच्या सहजीवनातील अतिशय तरल आणि भावुक नात्यांचा त्यांनी केलेला उलगडा म्हणजे त्यांच्या साहित्यिक उंचीचा एक आगळा नमुना आहे. डॉ. साळुंखे यांच्या वैचारिक प्रवासाला शुभेच्छा देत असतानाच त्यांच्या मौलिक कार्याची दखल सर्व सामाजिक प्रवाहांतील जाणत्यांनी घेणे तितकेच गरजेचे आहे.

संकलित-  http://prshntdesai.blogspot.com/

4 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes