रविवार, एप्रिल २४, २०११

बहुजनांनो आत्मपरीक्षण करा

विषमतावादी ब्राम्हणी व्यवस्थेच्या दलदलीत रुतून बसल्यामुळे बहुजन समाजाची म्हणावी तशी प्रगती झाली नाही. हजारो वर्षे बहुजन समाजावर इथल्या व्यवस्थेने अन्यायच केलेला आहे. बहुजनांच्या या परिस्थितीला अन्याय करणारी सनातनी भिक्षुकशाही जेवढी जबाबदार आहेत तेवढेच अन्याय सहन करणारेही बहुजनही जबाबदार आहेत. बहुजन समाजाला ब्राम्हणी गुलामीतून बाहेर काढण्यासाठी बुद्ध-महावीरांपासून फुले-शाहू-आंबेडकर आणि बळीराजा, सम्राट अशोकापासून शिवरायांपर्यंत अनेक महापुरुषांनी आपले आयुष्य खर्ची घातले. काहींनी सामाजिक चळवळी उभारून तर काहींनी राजकीय चळवळीच्या माध्यमातून बहुजन समाजाच्या प्रगतीला, विकासाला चालना दिली. तरी अजूनही हा समाज या गुलामीतून पुरता बाहेर पडलेला नाही. कोणत्याही समाजाला स्वतःवरील अन्यायाची जाणीव झाल्याशिवाय तो अन्यायाविरुद्ध पेटून उठत नाही. बहुजन समाजाला आपल्यावर होणाऱ्या अन्यायाची पूर्णपणे जाणीव नाही. स्वतःचे खरे मित्र कोण, शत्रू कोण याचे भान नाही. अन्यायी व्यवस्थेविरुद्ध संघर्ष करताना जर लक्षच निश्चित नसेल तर चळवळ दिशाहीन होते. शत्रूला मित्र समजून जर त्याच्याबरोबर मैत्री केली तर तो धोका देणार नाही याची खात्री कोण देवू शकेल ?

कोणत्याही चळवळीसाठी संघटन अतिशय महत्वाचे असते. जर संघटनात्मक पातळीवर प्रयत्न झाले तर अधिक यश मिळू शकते. उत्तम वैचारिक आणि निस्वार्थी संघटन हे चळवळीचे बलस्थान असते. त्यामुळे बहुजनांनी संघटीत झाले पाहिजे.

बहुजन समाजात अठरापगड जाती आणि त्यातही अनेक पोटजाती अशी इथली सामाजिक व्यवस्था आहे. ही जातीची उतरंड असल्याने प्रत्येक जात स्वताला एखाद्या जातीपेक्षा श्रेष्ठ आणि दुसऱ्या एखादया जातीपेक्षा कमी समजते. जातीजातीतील हा श्रेष्ठ-कनिष्ठ्भाव ज्याप्रमाणे अस्तित्वात आहे त्याप्रमाणेच प्रत्येक जातीत हजारो पोटजाती आहेत. एकाच जातीतील विविध पोटजातीतही बेटी व्यवहार होत नाहीत. लग्नसंबंध ठरवताना आपण जातीला आणि तिच्या तथाकथित प्रतिष्ठेला फार महत्व देतो. बहुजनवादी फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीत काम करणारेही बहुतांशी कार्यकर्ते जातीच्या श्रेष्ठ-कनिष्ठतेच्या कल्पनेत अडकून पडतात. बऱ्याच कार्यकर्त्यांचे विचार प्रामाणिक असतात, परंतु ते विचार कृतीत उतरवताना मात्र त्यांना स्वकीय लोकांशी (कुटुंबीय, नातेवाईक आणि जातबांधव) संघर्ष करावा लागतो. या संघर्षात त्या कार्यकर्त्यांचे अतिशय खच्चीकरण होते. उदा. एखादया उच्च जातीतील पुरुष-स्त्रीने तुलनेने खालच्या समजल्या जाणाऱ्या जातीतील पुरुष-स्त्रीशी लग्न करायचे ठरवले तर समाजात त्यांना फार विरोध सहन करावा लागतो. समजा कुटुंबीय-नातेवाईक यांचा विरोध पत्करूनही एखादया व्यक्तीने असे लग्न केले तर त्याला वाळीत टाकणे, त्याच्याशी सर्व व्यवहार बंद करणे अशा प्रकारे त्रास दिला जातो. फुले-शाहू-आंबेडकरवादी चळवळीत काम करत असताना विशिष्ठ भूमिका घेतल्याने त्रास सहन करत असलेले काही कार्यकर्ते मी पहिले आहेत. अशा कार्यकर्त्यांना समाजात, ऑफिसमध्ये जाणूनबुजून दूर ठेवले जाते. त्यांना सर्वांमध्ये मिसळून घेतले जात नाही. फक्त विचार मांडल्याने जर कार्यकर्त्यांवर अशी वेळ येत असेल तर कल्पना करा कि कृती केल्याने काय होईल. आणि ही त्रास देणारी मंडळी बहुजन समाजातीलच असतात हेही खेदाने नमूद करावेसे वाटते. याचा अर्थ नाउमेद होवून वैचारिक लढा बंद करायचा असा अजिबात नाही. उलट सर्व समाजाला विश्वासात घेवून त्याना आपले विचार पटवून द्यावेत. 

आजपर्यंत ज्यांनी-ज्यांनी बहुजन समाजाच्या मुक्तीसाठी संघर्ष केला त्यांना काय समाजाने लगेच स्वीकारले नाही. त्यांना विरोध करणाऱ्या प्रवृत्ती तेव्हाही होत्या आणि आजही आहेत. आणि त्या सर्व जाती-धर्मात आहेत. बहुजन समाज आपल्याच माणसांच्या विरोधात भडकून वागतो याला इतिहास साक्षी आहे. आपल्यात काही उणीवा, दोष असतील तर चिंतन आणि अभ्यासाने आपणच ते दूर केले पाहिजेत. वैचारिक शत्रूबरोबर आम्हाला आपल्याही अज्ञानी बांधवांचे प्रबोधन करावे लागेल. बहुजन समाजावरील विषमतावादी व्यवस्थेला जरी इथले सनातनी ब्राम्हण जबाबदार असले तरी व्यवस्थेची ही ओझी बहुजन समाजच वागवत आला आहे. ३.५ % ब्राम्हण देशावर वर्चस्व गाजवतात याचा अर्थ काय ? जगात असे एकही उदाहरण नसेल कि जिथे विशिष्ठ भूमिका घेणाऱ्या ३-४ % लोकांनी बाकीच्या ९६-९७ % लोकांना गुलाम केले असेल आणि तेही पाच हजार वर्षे. परंतु भारतात मात्र ३.५ % ब्राम्हणानी पूर्ण समाजावर वर्चस्व गाजवले आहे. अर्थातच हे आपल्या सहभागाशिवाय शक्य झाले का ? आपणच खुळ्यासारखे ब्राम्हणी भूलभूलैय्या च्या मागे लागतो. 

भारतात लाखो-करोडो मंदिरे आहेत. त्यातली काही तर गर्भश्रीमंत आहेत. या मंदिरात पौरोहित्य करणारा वर्ग हा ब्राम्हण असतो. परंतु त्या मंदिरात जावून लाखो-करोडो रुपये देवाच्या नावाने उधळणारे बहुजनच आहेत. गणेश उत्सव, नवरात्री उत्सव, दिवाळी अशा अनेक सणात करोडो रुपयांची उधळपट्टी करून आपला अमुल्य वेळ वाया घालवणारे बहुजनच आहेत. मुहूर्त आणि सत्यनारायण पूजेचे थोतांड माजवून ब्राम्हणांची झोळी भरणारे आपणच आहोत. पोथ्या-पुराणे, व्रतवैकल्ये, हरिनाम सप्ताह यात रस दाखवणारे आपणच आहोत. जर ब्राम्हणांनी निर्माण केलेली ही व्यवस्था आपणाला इतकी प्रिय असेल तर त्या व्यवस्थेला दोष का द्यायचा ? या सर्व व्यवस्थेने बहुजन समाजाचे मेंदू पोखरले आणि तरी आपण खुळ्यासारखे त्याच्याच मागे धावत असू तर आपणच आपले शत्रू नाही का ? 

अशिक्षित लोक या व्यवस्थेचे बळी असतात हे मी समजू शकतो. शिक्षणाच्या अभावी त्याना ना या व्यवस्थेचे खरे रूप समजते ना आपल्यावरील अन्यायाची जाणीव होते. त्यामुळे त्यांची गोष्ट समजण्यासारखी आहे. परंतु आमची एम. एस्सी. पी. एच.डी. झालेली मुलगी जेव्हा सोळा सोमवारचा उपवास करते तेव्हा बहुजनांच्या मेंदूचे कसे दिवाळे निघाले आहे ते लक्षात येते. आमची सुशिक्षित पिढी बुवा-बापू-अम्मा-मातांच्या नादाला लागून बरबाद होत आहे याचे खरे दुःख वाटते. आपणच अशा भोंदू लोकांच्या पायावर लोटांगण घालत असू तर हे भोंदू समाज नासवताहेत असे आम्ही कसे म्हणू शकतो ? कारण आमचा समाज तर स्वतच नाश पावत चालला आहे. स्वताच्या हाताने स्वताचे वाटोळे करून घेत आहे त्यामुळे इतरांना दोष देवून काय फायदा ? दोष द्यायचा असेल तर स्वताला द्या. आपण ज्या चुका करतोय त्या समजून घेवून मान्य करा आणि मग या दलदलीतून बाहेर पडायचा प्रयत्न करा. 

या विषमतावादी व्यवस्थेचे निर्माते कधीही ही व्यवस्था नष्ट करणार नाहीत. ती व्यवस्था आपल्यावर अन्याय करते, यामुळे आपले नुकसान होतेय हे ओळखून तरी बहुजन समाजाने जागे व्हावे.

5 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes