बुधवार, एप्रिल २०, २०११

ही बहुजनांची संस्कृती नाही

गेले काही दिवस बहुजन चळवळीतील कार्यकर्ते जोमाने काम करत आहेत. बहुजन समाजाला जागृत करण्यासाठी खरा इतिहास मांडणे आणि खोटया व विकृत इतिहासाला विरोध करणे यात बहुजन तरुणांनी आघाडी घेतली आहे. जिथे क्रिया आहे तिथे ओघानेच प्रतिक्रिया येणारच. बहुजनांचा इतिहास विकृत करण्याचा कुणी प्रयत्न केला तर त्याला विरोध होणारच. दीडशे वर्षापूर्वी महात्मा फुले व सावित्रीमाई या दाम्पत्याने बहुजन समाजाला शिक्षणाचा हक्क मिळवून दिला. त्याअगोदर अपवादानेच बहुजन समाजातील लोक शिक्षण घेत होते. सामान्य बहुजन समाजाला तर शिक्षणाची दारे पूर्णपणे बंदच होती. त्यामुळे कितीही खोटा इतिहास मांडला गेला तरीही बहुजन समाजाची त्यावर कोणतीही प्रतिक्रिया नव्हती. बहुजन समाजाला गुलामीत लोटण्याचे षडयंत्र राबवले गेले तरी बहुजन समाज त्याविरुद्ध पेटून उठत नव्हता. 

पण आज काळ बदललाय. फुले दाम्पत्याने केलेल्या सामाजिक, शैक्षणिक क्रांतीमुळे बहुजन समाज जागृत होवू लागला आहे. पंडितांच्या कोंडीत सापडलेली शिक्षणाची गंगा फुले दाम्पत्याने बहुजनांच्या घराघरात पोहचवली. पुढे शाहूंनी तोच वारसा चालू ठेवला. डॉ. बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून बहुजन समाजाला आपले हक्क-अधिकार बहाल केले गेले. आता बहुजन समाज शिकतोय, अभ्यास करतोय, चिंतन करतोय ही समाधानाची बाब आहे. त्यामुळे सध्याच्या काळात कुणी खोटा इतिहास निर्माण करण्याचा किंवा बहुजन समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला तर बहुजन त्याची चिकित्सा करू लागला आहे. बहुजन समाजातील तरुणांमध्ये तर कमालीचा उत्साह आहे. कारण गेली पाच हजार वर्षे गुलामीची काळीकुट्ट रात्र अनुभवल्यानंतर नुकतीच कुठे स्वातंत्र्याची पहाट दिसू लागली आहे. त्यामुळे बहुजन तरुण उत्साहाने फुले-शाहू-आंबेडकरी चळवळ पुढे नेत आहे.

परंतु हे सर्व करत असताना आपण जे विचार मांडतोय त्यात उत्साहाच्या भरात किंवा आतापर्यंत ज्यांनी आपल्यावर अन्याय केला त्याबद्दलच्या रागामुळे द्वेष दिसू लागला आहे. समोरच्या व्यक्तीने किंवा प्रवृत्तीने ज्या भाषेत मांडणी केली आहे त्याच भाषेत बहुजन त्यांना उत्तर देवू लागले आहेत.त्यामुळे चळवळीच्या अवतीभोवती एक द्वेषमुलक वातावरण तयार होत आहे. द्वेषावर आधारित चळवळ टिकू शकत नाही हा इतिहास आहे. अशा चळवळीला थोड्याच दिवसात कमालीची लोकप्रियता प्राप्त होते, परंतु लगेच तिच्या संपण्याचीही प्रक्रिया चालू होते. हिटलरची चळवळ द्वेषावर आधारित होती. हजारो ज्यूंची त्याने अमानुष कत्तल केली होती. हिटलरच्या अतिरेकामुळे हिटलर तर संपला पण त्याची चळवळही संपली. बहुजनांची चळवळ जर संपू नये किंवा तिला नकारात्मक प्रसिद्धी मिळू नये असे वाटत असेल तर बहुजनांनी आपल्या चळवळीची दिशा ठरवली पाहिजे. भडक न लिहिता वैचारिक मांडणी करता येवू शकते हे डॉ. आ. ह. साळुंखेनी आपल्या लेखणीतून दाखवून दिले आहे. डॉ. आ. ह. साळुंखे सरांनी आजपर्यंत ३०-३५ पुस्तके लिहिली. शेकडो लेख लिहिले आणि हजारो व्याख्याने दिली. परंतु कधीही द्वेषमुलक विचार मांडला नाही. त्यांच्या मांडणीत एक प्रकारचा विवेक दिसून येतो. डॉ. साळुंखे सर बहुजनीय चळवळीचे मार्गदर्शक आणि जेष्ठ विचारवंत, अभ्यासक आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जर बहुजन समाज चळवळीची दिशा ठरवणार असेल तर ही चळवळ दीर्घकाळ टिकू शकेल आणि इच्छित साध्य प्राप्त करता येईल.

बहुजन तरुणांना भडकवण्यासाठी विविध स्तरावरून प्रयत्न केले जातात. बहुजनांनी आपला वेळ आणि शक्ती फक्त प्रतिक्रिया देण्यात खर्च करावी यासाठी षडयंत्र रचले जात आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे बहुजन या षडयंत्राला बळी पडत आहेत. ज्या लोकांनी बहुजन महामानवांची बदनामी केली त्याना प्रत्युत्तर देताना बहुजन तरुणांची भाषाही घसरते. परिणामी दोन्ही बाजूंकडून वैचारिक वाद-प्रतिवाद होण्याऐवजी शिव्या आणि अश्लील भाषा वापरण्यात येते. बहुजनांनी आपली उज्वल संस्कृती लक्षात घेतली पाहिजे. शिव्या देणे ही आपली संस्कृती नाही. सत्य इतिहास मांडणे हा द्वेष नाही. परंतु ते करत असताना आपली वैचारिक मांडणी मात्र सभ्य भाषेत करावी. विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत कोणतीही टिपण्णी करताना विशेष काळजी घ्यावी. स्त्री कोणत्याही जाती-धर्मातील असो, तिची बदनामी करता कामा नये. तिच्याबद्दल अश्लील आणि घाणेरड्या भाषेत आपण लिहिता कामा नये. आपली ती संस्कृती नाही. बहुजन समाजाने नेहमीच सर्व स्त्रियांचा आदर केला आहे.

अरे ज्या समाजात बुद्ध, महावीर, सम्राट अशोक, बळीराजादी बहुजन संस्कृतीचे महानायक होवून गेले तो समाज द्वेषमुलक भूमिका घेता कामा नये. या महामानवानी जगाला प्रेमाचा, समतेचा संदेश दिला. तो आपण आत्मसात केला पाहिजे. जग जोडायचे असेल तर ते प्रेमानेच जोडले पाहिजे हा बुद्धविचार आहे. बळीराजासारखा समतेचा महानायक आपल्या समाजात होवून गेला. छ. शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर, भाऊराव पाटील, अण्णा भाऊ साठे, गाडगेबाबा, तुकोबा, नामदेव, तुकडोजी अशी फार मोठ्या मनाची, मानवतेचा पुरस्कार करणारी माणसे आपल्या समाजात घडली आहेत. जिजाऊ, अहिल्यामाई, सावित्रीमाई, रमाई यासारखी उज्वल स्त्री परंपरा आपल्याला लाभली आहे. आजपर्यंत बहुजन समाजाने अन्याय सहन केला आहे. परंतु अन्याय करावा अशी आपल्या महामानवांची शिकवण नाही. स्वतःच्या घासातील अर्धा घास भुकेल्याला देणे आणि प्रेमाने जग जोडणे ही बहुजनीय संस्कृती आहे. आपण ती लक्षात घेवून प्रेमाचा संदेश समाजात पोहचवला पाहिजे. याचा अर्थ अन्याय सहन करा किंवा विकृतीला विरोध करू नका असा अजिबात नाही. उलट अन्याय आणि विकृतीच्या विरोधात ठामपणे उभे रहा. परंतु ते करत असताना भाषा मात्र सभ्य वापरा. जेणेकरून आपल्या भाषेमुळे बहुजनीय चळवळ बदनाम व्हायला नको.

बहुजन चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे कि आपणाला भडकवण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब केला जातोय. त्या षडयंत्राला बळी पडू नका. अभ्यासपूर्ण भाषेत समोरच्याचा प्रतिवाद करा. तरच बहुजनीय चळवळीला अधिक झळाळी आणि वैचारिक पावित्र्य प्राप्त होईल.

13 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes