मंगळवार, मार्च २२, २०११

‘हरी नरके’ वादाची दुसरी बाजू

प्रा. हरी नरके
गेल्या काही दिवसात बहुजन चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रा. हरी नरके आणि बामसेफ, संभाजी ब्रिगेड यांच्यातील वादामुळे बहुजन कार्यकर्ते द्विधा मनस्थितीत सापडले आहेत. या वादात बामसेफ आणि संभाजी ब्रिगेडची बाजू ‘मुलनिवासी नायक’ मधून नेहमी मांडली जाते. परंतु हरी नरकेंची बाजू पाहण्यात आली नव्हती. एखाद्या वादग्रस्त गोष्टीवर लिहीत, बोलत असताना दोन्ही बाजू ऐकून घेणे क्रमप्राप्त आहे. एकच बाजू आपण सातत्याने मांडायची आणि दुसऱ्याची बाजू ऐकूनच घ्यायची नाही किंवा दुसऱ्याला त्याची बाजू मांडायची संधीही द्यायची नाही हा शुद्ध पक्षपातीपणा आहे. तो पक्षपातीपणा मी तरी करणार नाही. याआधी चारच दिवसापूर्वी मी या ब्लॉगवर ‘हरी नरकेंची विसंगत भूमिका’ हा लेख लिहिला होता. तो लेख लिहिण्यामागे प्रामाणिक भावना होती. हरी नरके यांच्यावर टीका करणे हा त्या लेखाचा उद्देश नव्हता. (हरी नरके यांच्यावर टीका करावी एवढी माझी वैचारिक उंची नाही. माझ्या वयापेक्षा जास्त वर्षे नरके सरांनी फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीसाठी खर्च केली आहेत.) परंतु लेख लिहिण्यापूर्वी मी एकदा नरके सरांशी बोलायला हवं होतं. म्हणजे त्यांनी माझ्या प्रश्नांचा खुलासा केला असता. परंतु गेले काही दिवस नरके सरांना अनेक अनाहूत कॉल्स येत असल्याने ते माझा कॉल रिसिव्ह करतील का ही शंका होतीच. नरके सरांना कॉल करून अनेक जण धमक्या देत आहेत, त्यामुळे ते त्रस्त होते. मग आपल्याच एखाद्या सहकाऱ्याला धमक्या देण्याइतपत आपली नैतिक पातळी खालावली आहे का ? याचा विचारसुद्धा चळवळीतील कार्यकर्त्यांनी केला पाहिजे.

२४ ऑक्टोबर २०१० च्या ‘दादोजी कोंडदेव हटाव संघर्ष मेळाव्या’त प्रा. हरी नरके आणि डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या विषयीचा तो ठराव पाहूनच मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. परंतु त्यानंतर वाद अशाप्रकारे वाढत जाईल असे वाटले नव्हते. त्यानंतर दादोजी कोंडदेवचा पुतळा हटवण्यात आला आणि तो ठराव सर्वजण विसरूनही गेले. त्यांनतर प्रा. हरी नरके यांचा ‘लोकप्रभा’ मध्ये लेख वाचला आणि मनात अनेक प्रश्नांचे काहूर उठले. त्याच प्रमाणे ‘मुलनिवासी नायक’मधून गेल्या सहा महिन्यांपासून हरी नरके यांना ज्या पद्धतीने लक्ष्य करण्यात आले ते पाहून मन व्यथित झाले. प्रा. हरी नरके, मेश्राम साहेब, खेडेकर साहेब ही सारी मोठी, अभ्यासू आणि विचारी माणसं आहेत. त्यांच्या मानानं आम्ही चळवळीत काम करणारी तरुण मुलं फारच लहान आहोत. आपल्या घरातील मोठ्या माणसांची भांडणं चालू झाली तर लहान मुलं ज्याप्रमाणे कावरी-बावरी होतात, तशी आमची गत झाली आहे. नक्की वाद का चालू आहे, कशासाठी चालू आहे या गोष्टीचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. ‘मुलनिवासी नायक’मधून तर हरी नरके गद्दार, हरी नरके ब्राम्हणांना फितूर अशी मांडणी होतच होती. पण त्याहीपुढे जावून हरी नरकेंच्या पितृत्वाविषयी टीकाटिपण्णी केली गेली, (संदर्भ- मुलनिवासी नायक, ३ फेब्रुवारी २०११) हा हरी नरकेंच्या आईचा अपमान/बदनामी नाही का ? ज्या माउलीने कि जी उस तोडणी कामगार होती, आपल्या मुलाला प्रतिकूल परिस्थितीत लहानाचा मोठा केला, त्याला शिकवले. त्यानंतर हरी नरके गेल्या २५-३० वर्षे फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीत सक्रीय आहेत. ज्यांनी २५ पेक्षा जास्त पुस्तके लिहिली. ६००० भाषणे केली. हजारो लेख लिहिले त्या हरी नरके यांच्याबद्दल आणि त्यांच्या आईबद्दल इतकी विकृत मांडणी.....गेल्या काही वर्षात जिजाऊंच्या बदनामीच्या निषेधार्त आपण अनेक आंदोलने केली. ब्राम्हणांच्या वर्चस्ववादी आणि विकृत भूमिकेविरुद्ध संघर्ष केला. त्याच संघर्षाचे एक शिलेदार असणाऱ्या प्रा. हरी नरके यांच्या आईचा कोणता मान-सन्मान आपण ठेवला ? हरी नरकेंच्या भूमिकेबाबत मतभेद असतील तर जरूर मांडावेत, पण मांडण्याची पद्धत कोणती असावी याचा जरातरी विचार आम्ही करणार आहोत कि नाही ?

‘मुलनिवासी नायक’मधून हरी नरके यांच्याविषयी अनेक लेख, बातम्या छापून आल्या. परंतु नरकेंचा एका ओळीचाही खुलासा का छापला नाही ? चळवळीत काम करताना सर्वांचे प्रत्येक मुद्द्यावर एकमत झालेच पाहिजे असा नियम नाही. किंवा आपण जी भूमिका घेतली आहे, तीच चळवळीतील प्रत्येकाने घेतली पाहिजे असा अट्टाहासही असता कामा नये. मग काही गोष्टीत मतभेद झाले म्हणून एखाद्याला फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीतून बहिष्कृत करणार का ? ज्या माणसाने आपलं आजपर्यंतचं सारं आयुष्य केवळ चळवळीसाठी खर्च केलं आहे. ज्यांनी अभ्यास, संशोधन करून अनेक नव्या गोष्टी समोर आणल्या त्यांना आपण इतक्या सहजपणे कसे काय गद्दार ठरवू शकतो ? विशेषतः चळवळीत काम करणाऱ्या तरुण मुलांनी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आपण कुणाबद्दल बोलतो, काय बोलतो याचं तारतम्य आणि भान आपल्याला असायला हवं. हरी नरकेच नव्हे तर चळवळीतील इतर कोणतीही व्यक्ती एखाद्या भूमिकेमुळे चुकीची आहे, असे वाटत असेल तर त्याबद्दल जरूर लिहा, बोला. तुम्हाला टीका करण्याचा अधिकार आहे. परंतु तसे करताना समोरच्या व्यक्तीचे वय, पद, प्रतिष्ठा आणि त्याचे चळवळीतील योगदान याचा जर आपण विचार करणार नसू तर आपण कृतघ्न आहोत असे मला वाटते.

‘मुलनिवासी नायक’ला टीका करण्याचा अधिकार आहे. नरके सरांची एखादी भूमिका पटली नाही तर त्याविरुद्ध अग्रलेख लिहा, बातम्या छापा. परंतु ज्या गोष्टीला काहीही अर्थ नाही अशा बातम्या आणि लेख छापण्यात काय अर्थ आहे ? कुणीतरी नरकेंना फोन करायचा, अद्वातद्वा बोलायचे, नरकेंचे सामाजिक चळवळीतील योगदान विसरून जाब विचारल्याच्या अविर्भावात प्रश्न करायचे आणि तेच स्टिंग ऑपरेशनचा आव आणून ‘मुलनिवासी नायक’ मध्ये छापायचं यात कोणती नैतिकता आहे. चळवळीतील आपल्या सहकाऱ्याविरुद्ध इतकी टोकाची भावना.....यामुळे फुले-शाहू-आंबेडकरी चळवळ पुढे जाईल कि मागे ? याचा विचार आपण करणार आहोत कि नाही ?

‘मुलनिवासी नायक’मधून हरी नरके यांच्यावर जे आरोप होत आहेत त्याला उत्तर देण्याची नरके सरांची तयारी आहे. त्यांनी जो खुलासा मुलनिवासी नायककडे पाठवला तो छापला गेला नाही. मग आपल्यावरील आरोपांचे खंडन करण्यासाठी नरके सरांनी इतर माध्यमे (मग ती ब्राम्हणांची असली तरी) वापरली तर त्यांना दोष देण्याचा अधिकार आपणाला आहे काय ? प्रा. हरी नरके यांनी आजपर्यंत मुलनिवासी नायकमधील आरोपांबाबत लिहिलेले नाही (अपवाद-लोकप्रभा). जर त्यानीही इतर माध्यमामधून लिहायला चालू केले तर वाद अधिकच वाढत जाणार. परिणामी चळवळीचेच नुकसान होण्याची शक्यता आहे.

अजून वेळ गेलेली नाही. हरी नरके चर्चेला तयार आहेत. काही बाबींवर मतभेद आहेत, ते चर्चेने दूर केले पाहिजेत. कारण चर्चेने बरेच प्रश्न सुटू शकतात. नरके सरांचा चर्चेवर विश्वास आहे. तो आपणही ठेवायला हरकत नाही.

16 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes