रविवार, फेब्रुवारी २०, २०११

शिवचरित्रातील वादावर इतिहास अभ्यासक डॉ. नीरज साळुंखे यांची प्रतिक्रिया

डॉ. नीरज साळुंखे
शिवजयंती साजरी करत असताना वर्तमान शिवचरित्र वादग्रस्त का केलं जातं, याचं मागोवा घेणं आवश्यक आहे. शिवचरित्राची महानता या सगळ्या वादांना पुरून उरणारी आहे. पण काळ सोकावतो तसे हे वाद सोकावू नयेत यासाठीच हे वाद निर्माण करण्यामागची मानसिकता समजून घेणं आवश्यक आहे. त्या अनुषंगाने इतिहास अभ्यासक डॉ. नीरज साळुंखे यांनी साप्ताहिक चित्रलेखाला दिलेली प्रतिक्रिया अतिशय उद्बोधक आहे.

समाजजीवनात शिवरायांचं जीवन महत्वपूर्ण आहे. अशा महान व्यक्तीशी समाजातील प्रत्येक गट एकरूप होवू इच्छितो. म्हणूनच समाजात जे वाद आहेत, त्याचं प्रतिबिंब शिवचरित्रात उमटतं. हे करताना ऐतिहासिक साधनांपैकी आपल्याला अनुकूल साधनं घ्यायची; इतर झाकायची, असा प्रकार होत असतो.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला शिवचरित्रावर ज्यांनी काम केलं, त्यांनी काही मर्यादित साधनंच पुढे आणली किंवा आपल्याला अनुकूल ठरणार नाहीत, अशी साधनं दुर्लक्षित ठेवली. उदा. इतिहासाचार्य राजवाडे. सुरुवातीला रामदासाच्या प्रतीकाचं शिवचरित्रावर रोपण करण्यात त्यांचाच पुढाकार होता. राधामाधवविलासचंपू हे शहाजींचं चरित्र सापडल्यावर शहाजी राजे हे केवळ जहागीरदार नव्हते, तर स्वातंत्र्याकांक्षी व्यक्ती होते. स्वराज्य निर्मितीमागे त्यांची प्रेरणा होती, हे स्पष्ट होत असतानाही या नव्याने हाती आलेल्या ग्रंथाला प्रस्तावना लिहिताना राजवाडे रामदासांना स्वराज्याचे प्रेरक मानतात. रामदासांच्या बाजूचे पुरावे नसताना आणि शहाजींच्या बाजूचे पुरावे असतानाही राजवाडेंचा  जीव रामदासांना महत्व देण्यात गुंतला.

आज सर्वसामान्यांची शिवचरित्राची ओळख होते, ती चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकातून. सगळ्यांनी वाचलेलं असं ते एकच पुस्तक आहे. या पुस्तकातील शिवचरित्र अत्यंत एकांगी होतं. पण गेली चाळीस वर्षं लोकांचा त्याच्यावर विश्वास होता. त्यामुळे त्याच्यापेक्षा काही वेगळं समोर आलं, तर ते त्यांना वादग्रस्त वाटतं. अर्थात ही पाहिली स्वाभाविक प्रतिक्रिया असते. पण समोर आलेल्या पुराव्यांची निःपक्षपाती चिकित्सा होत राहिली, तर ही वादग्रस्तता टिकणारी नाही. कारण आता नवीन साधनांमधून काही दुर्लक्षित राहिलेली कागदपत्रं पुढे येत आहेत. त्यातनं दुर्लक्षित पुरावे समोर येत  आहेत.

दादोजी हा शिवाजीचा गुरु होता, असं आजही बलकवडे जे सांगतात ते ९१ कलमी बखरीच्या आधारे सांगतात, पण ही बखर विश्वसनीय नाही, हे आज इतिहासकारांमध्ये मान्य झालेलं असतानाही बलकवडे तिचाच आधार घेवून लिखाण करतात आणि माध्यमंही ते छापतात. यातनं वादग्रस्तता निर्माण होते.

खरं तर, आज शिवचरित्राबाबतचे सगळे वाद मिटलेले आहेत. त्याबाबतचे अस्सल पुरावे सापडलेले आहेत. या अस्सल पुराव्यांच्या आधारेच आम्ही स्वराज्य निर्मितीचं स्वप्न पाहणाऱ्या शहाजी राजाचं महत्व सांगत आहोत. त्यामुळे आमच्या दृष्टीने आता काही वाद उरलेला नाही. आधीच्या इतिहासकारांनी दुर्लक्षित ठेवलेले पुरावे आम्ही पुढे आणलेले आहेत. शिवराय गोब्राम्हणप्रतिपालक नव्हते, मुस्लीमविरोधक नव्हते, दादोजी-रामदास हे त्यांचे गुरु नव्हते, शहाजीनी काळजीपूर्वक शिवरायांचं जीवन घडवलं होतं, वयाच्या बाराव्या वर्षानंतर शिवराय बंगळूरात शहाजी राजांसोबत होते, शहाजींनी स्वातंत्र्यप्राप्तीचा आपला फसलेला डाव पुन्हा मांडला आणि त्यासाठी १२ वर्षांचा आपला कोवळा पोर पणाला लावला, या गोष्टी आता सिद्ध झाल्या आहेत. ज्यांचे हितसंबंध या पुनर्मांडणीने दुखावतात, त्यांना हे वाद सुरु ठेवायचे आहेत.

दादोजी हा आदिलशहाचा निष्ठावान सेवक होता. दादोजीचा बंद ए इलाही आदिलशाही हा शिक्का सापडलेला आहे. पण त्याची चर्चाही केली जात नाही. दादोजी आदिलशहाचा नोकर असल्याचा थेट पुरावा समोर आला तरी तो वापरायचा नाही आणि उत्तरकालीन अविश्वसनीय पुराव्यांच्या आधारे कहाण्या रचायच्या, हा उद्योग सुरु आहे.

प्रत्येक वादाच्या संदर्भातले पुरावे समोर आलेले आहेत. आज शिवचरित्र वादग्रस्त नाही. सगळे वाद मिटलेले आहेत.

नीरज साळुंखेंचं हे म्हणणं खरंच आहे. शंभर वर्षांपासून भिजत पडलेल्या सगळ्या वादांना इतिहासकारांच्या नव्या पिढीने दुर्लक्षित पुरावे समोर आणून उत्तर दिलं आहे. पण प्रश्न केवळ वादांचा नाही; तर वाद निर्माण करणाऱ्यांच्या मनोवृत्तीचा आहे. या मनोवृत्तीला व्यापून राहिलेल्या जातीव्यवस्थेचा, त्यैल वर्चस्ववादी गंडाचा  आहे. हा गंड शिवचरित्रात फटी निर्माण करत राहणार, वाद पेरत राहणार, हे उघड आहे. म्हणूनच रयतेने आपला राजा ओळखावा, त्याच्या कार्याचं मर्म ओळखावं आणि ते वाढवावं. वादांच्या गैर दाव्यांना हेच उत्तर आहे.  
साभार- साप्ताहिक चित्रलेखा 

2 टिप्पणी(ण्या):

Pramod Mulik म्हणाले...

हे साप्ताहिक चित्रलेखा कुठ वाचतोस

Prakash Pol, Karad. म्हणाले...

प्रमोद,

चित्रलेखा हे साप्ताहिक महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात उपलब्ध आहे. प्रत्येक शनिवारी नवीन चित्रलेखा येते. कराड च्या बस स्थानक पेपर स्टोल वरून तू विकत घेवू शकतोस. दहा रुपये किंमत आहे. चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव यांचे सडेतोड लेख वाचण्यासारखे असतात. कोणत्याही प्रश्नावर मला त्यांची भूमिका ही संतुलित वाटते. सागर राजहंस, संध्या नरे-पवार, विलास पाटील, डॉ. जे. बी. शिंदे, अशोक राणा यांचीही सदरे खूप चांगली असतात.
कराड ला टाऊन हॉल च्या ग्रंथालयात चित्रलेखा व इतर बरीच नियतकालिके असतात. तू तेथे जावूनही वाचू शकतोस.

चळवळीसाठी प्रसारमाध्यमे खूप आवश्यक असतात. दुर्दैवाने बहुतांशी प्रशार्माध्यामे ही ब्राम्हणी प्रवृत्तीच्या लोकांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे ते आपली चळवळ बदनाम कशी होईल यासाठी प्रयत्न करत असतात. म्हनुनच बहुजनांनी बहुजनवादी प्रसारमाध्यमे वाचली पाहिजेत. त्यांचा प्रचार, प्रसार केला पाहिजे.

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes