शनिवार, फेब्रुवारी १९, २०११

शिवरायांचा आठवावा विचार...


छ. शिवराय....स्वराज्याची स्थापना करून या मातीतल्या गोरगरीब माणसाला स्वाभिमानाने जीवन जगण्याची प्रेरणा देणारे युगपुरुष....स्त्रीला मातेचा दर्जा देवून, स्त्री ही मराठ्यांच्या देव्हाऱ्यातील देवता आहे अशी निर्मळ भूमिका घेणारे महामानव....या मातीत आत्मसन्मानाची फुंकर घालणारे दृष्टे राजे..... प्रबोधनकार ठाकरे म्हणतात, “शिवाजी महाराजांचे नाव घेतले की ३३ कोटी देवांची फलटण बाद होते, इतकी ताकद 'शिवाजी' या नावात आहे”.

आज १९ फेब्रुवारी हा शिवरायांचा जन्मदिन....स्वाभिमानाने जगू पाहणाऱ्या बहुजन समाजाचे शिवरायांशी अतूट नाते आहे. शिवछत्रपतींनी स्वराज्यातील रयतेच्या मनात स्वाभिमान निर्माण केला. अत्याचारी आणि जुलमी राजवटीविरोधात स्वराज्यातील सामान्य माणूसही विद्रोह करू शकतो ही भावना शिवरायांनी निर्माण केली. शिवराय या देशातील सर्व सामान्य माणसाच्या मनात अधिराज्य गाजवत आहेत ते यामुळेच.  सामाजिक, राजकीय परिस्थितीने विफल झालेला सामान्य माणूस म्हणतो आज शिवराय हवे होते...'राजे पुन्हा जन्माला या...' परंतु छत्रपती आज पुन्हा जन्माला येवू शकत नाहीत हे वास्तव आहे. पण चारशे वर्षांपूर्वी शिवरायांनी जो उत्तुंग विचार समाजाला दिला आहे तो आजही आपल्यामध्ये आहे. शिवचरित्र म्हणजे केवळ ढाल-तलवारीची लढाई नाही. शिवचरित्र एक विचार आहे. माणसाला माणूस म्हणून जगण्यास प्रेरित करणारा एक संस्कार आहे. तो संस्कार आपण जपला पाहिजे. शिवरायांच्या चरित्रातून आपण नक्की काय शिकले पाहिजे या दृष्टीने आपणास विचार करणे गरजेचे आहे.

शिवरायांनी उभ्या आयुष्यात कधी माणसामाणसात भेद केला नाही. जात, धर्म, प्रांत, भाषा या गोष्टींवरून माणसाना एकमेकापासून वेगळे केले नाही. उलट सर्वाना स्वराज्याच्या एका धाग्यात गुंफून यशस्वी वाटचाल केली. शिवराय हे सर्व जाती-धर्मांना समान लेखणारे होते. म्हणूनच धर्मग्रंथांनी ब्राम्हणांना शिक्षा करू नये असे सांगितले असतानाही “ब्राम्हण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो ?” अशी सडेतोड भूमिका शिवराय घेतात. त्यामुळेच अफजल खान वधाच्या वेळी शिवरायांवर वार करणाऱ्या कृष्णा भास्कर कुलकर्णीला शिवरायांनी संपवले. स्वराज्याला विरोध करणारा माणूस कोणत्याही जाती-धर्मातील असला तरी तो स्वराज्याचा शत्रू आहे असेच शिवरायांनी मानले. त्यामुळेच स्वराज्याचे विरोधक जावळीचे चंद्रराव मोरे अथवा मोघलांना सामील झालेले संभाजी कावजी यानाही शिवरायांनी माफ केले नाही. शिवरायांच्या चरित्रातून आपण हा गुण घेतला पाहिजे. जातींचा तथाकथित वर्चस्ववाद बाजूला ठेवून शिवरायांच्या विचाराने सर्व समावेशक समाज निर्मितीसाठी आपण प्रयत्न केले पाहिजे.

शिवरायांच्या आयुष्यात त्यांनी स्त्रियांना फार मोठा सन्मान दिला. ज्या काळात स्त्रियांवर धर्मव्यवस्थेने अन्यायकारक बंधने लादली होती, त्या काळातही स्त्रीला देवतेची पर्यायाने अतिशय सन्मानाची वागणूक देणारा हा राजा होता. म्हणूनच गरीब मुलीवर अत्याचार करणाऱ्या रांझ्याच्या पाटलाचे हात तोडण्याचे आदेश शिवरायांनी दिले. स्त्रियांबाबत इतकी सकारात्मक आणि उत्तुंग भूमिका घेणारे शिवराय एकमेवाद्वितीयच होते. शिवचरित्रातून हा गुण स्वीकारून प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करावी. आपल्या घरातील आई, बहिण व इतर स्त्रियांना सन्मानकारक वागणूक द्यावी. त्यांना निर्णयप्रक्रियेत सामील करून घ्यावे. घरातील मुलीना उच्च शिक्षण द्यावे.

अंधश्रद्धाना शिवरायांनी आपल्या आयुष्यात कधीही स्थान दिले नाही. शिवरायांनी अनेक किल्ले बांधले. काही किल्ल्यांची डागडुजी केली. परंतु कोणत्याही किल्ल्यावर सत्यनारायण पूजा घातली नाही. अनेकवेळा किल्ल्यांचे बांधकाम करताना सापडलेल्या धातूंच्या देवाच्या मूर्ती वितळवून स्वराज्यासाठी खजिना उभा केला. शिवरायांच्या सर्व लढाया अमावास्येच्या काळ्याकुट्ट रात्रीच असत. परंतु शिवरायांचे नाव पावलोपावली घेणारे आपण मात्र प्रत्येक गोष्ट करताना मुहूर्ताचे थोतांड माजवत बसतो. महात्मा फुले म्हणतात, “प्रत्येक लढाई मुहूर्त पाहूनच करणारी पेशवाई बुडाली आणि मुहूर्त न बघणारे इंग्रज जिंकले”. शिवराय अंधश्रद्धा मुक्त होते. त्यांचा आदर्श मानून आपणही अंधश्रद्धा आणि फालतू थोतांडाना तिलांजली दिली पाहिजे.

आज शिवराय असते तर ?

राजे पुन्हा जन्माला या....अशा प्रकारची वाक्ये आपण पुन्हा-पुन्हा बोलतो. शिवरायांना जे आयुष्य मिळाले ते त्यांनी सत्कारणी लावले. आयुष्यभर न्यायाने वाटचाल करून स्वराज्य उभे केले. स्वाभिमानी रयतेची निर्मिती केली. शिवरायांनी दिलेला विचार आजही आमच्या डोक्यात आहे. तरीही आपण कर्तुत्व न गाजवता शिवरायांनी पुन्हा जन्म घ्यावा म्हणून साकडं घालत असू तर शिवरायांचे नाव घ्यायचा अधिकार आपल्याला नाही. आणि आज शिवराय पुन्हा जन्माला आले तरी ते ढाल-तलवारीची लढाई करणार नाहीत. आजचे युग हे विज्ञान-तंत्रज्ञान-संगणकाचे युग आहे. शिवरायांनी आज लेखणी हातात घेतली असती. गरिबांना नाडणाऱ्या राज्यकर्ते, सावकार आणि धर्ममार्तंडावर ती लेखणी रोखली असती. संगणकाचे ज्ञान प्राप्त करून जगावर राज्य करण्याची धमक बाळगली असती. आज आपणालाही याच मार्गाने जायचे आहे. केवळ जय शिवाजी...म्हणून शिवरायांच्या कार्याचे खरे चीज होणार नाही. त्यांचे विचार आणि कार्य प्रत्यक्ष कृतीत उतरवल्याशिवाय आपण स्वतःला 'शिवभक्त' म्हणवून घेणे योग्य नाही.

शिवचरित्रातून आपण आज हा संदेश घेतला पाहिजे. आदर्श स्वराज्य निर्माण करून माणसांना जोडणाऱ्या या राजाला विनम्र वंदन...

4 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes