गुरुवार, फेब्रुवारी १७, २०११

शैक्षणिक क्रांतीच्या प्रणेत्यांची उपेक्षा कशासाठी ?
सावित्रीमाई
तर मित्रानो आजचा विषय तसा गंभीर आहे.  म्हटले तर गंभीर नाहीतर मानवतेला, बुद्धिवादाला ख़तपानी घालणारा  आहे.  बर्याच वेळा आपण आपला मुद्दा पूर्णपणे स्पष्ट करू शकत नाही.  त्यामुले काहीजणांचा  गैरसमज होण्याची शक्यता असते.  तसे पाहिले तर प्रतेक विषय हा बुद्धिवादाच्या कसोटितून घासून पुसून घेण्याचा माझा प्रयत्न असतो. परंतु  समोरची व्यक्ति त्याच तळमळिने तो विषय समजुन घेतेच असे नाही.  त्यामुळे   गैरसमज निर्माण होऊन दोष माझ्यावर येणार याची जाणीव असून ही मी तो
धोका पत्करतो.  कारण माझे विचार,  माझा प्रयत्न प्रामाणिक आहे हे मला ठावुक आहे.  कुणालाही दुखावण्याचा माझा हेतु नसतो. परंतु  ही विचारप्रणालीच अशी चिकित्सक आहे की कोणीतरी दुखावनारच.  एखाद्या वाईट प्रवृत्तिवर टिका केल्यानंतर एखादी व्यक्ति दुखावत असेल तर त्या व्यक्तीचे त्या प्रवृत्तिशी सामाजिक, मानसिक इंटरॅक्षन झालेले असते.  चुकीचे आहे हे समजत असून ही काही व्यक्ति केवळ  रूढी, परम्परा या नावाखाली वाईट आचार, विचार जपत बसतात. मी आज जो विषय मांडणार आहे तो माझ्याप्रमानेच इथल्या ८५% बहुजन समाजाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे.  केवळ गैरसमज पसरु नये म्हणून ही प्रस्तावना. 

विद्येची खरी देवता कोण ? हा वाद विनाकारण उकरून काढला जात आहे असे काही जणांना वाटण्याचा संभव आहे. कारण सामान्य बहुजन समाजाच्या मनावर आणि मेंदूवर प्रचलित धर्म व्यवस्थेने आणि तिच्या ठेकेदारांनी नियंत्रण मिळवले आहे. त्यामुळे आजवर भारतात धर्म व्यवस्थेचे ठेकेदार जे सांगतील तेच लोकांना सत्य वाटत आले आहे. कारण आपल्या देशात विचार आणि चिकित्सा करायला बंदी आहे ? हे असं का ? ते तसं का ? असले प्रश्न विचारायचे नसतात. नदीचं मूळ आणि ऋषीचं कूळ कधी शोधू नये असही धर्माने सांगून ठेवले आहे. त्यामुळे साहजिकच सामान्य माणूस परंपरेच्या नियंत्रणात राहतो. स्वताचा मेंदू वापरत नाही. त्यामुळे विद्येची खरी देवता कोण असा प्रश्न त्याला पडत नाही. आणि पडलाच तर कशाला मेलेली मढी उकरून काढताय म्हणून तो दुसर्यानाच दोष देत बसणार. परंतु फुले दाम्पत्याच्या विचाराने जागृत झालेला बहुजन मात्र स्वताचा मेंदू वापरणार आणि विचार ही करणार. त्यामुळे त्याला चिकित्सा ही करावीच लागणार. आणि चिकित्सा क्रमप्राप्त आहे. त्याबद्दल धर्म मार्तंड किंवा कुणी इतरांनी त्याला विरोध करायचे कारण नाही.
 
बहुतांशी वेळा आपण शैक्षणिक कार्यक्रमांची सुरुवात सरस्वती पूजनाने  करतो. मला मात्र ही पद्धत अतिशय चुकीची वाटते.  कारण  सरस्वतिला वैदिक संस्कृतीने विद्येची देवता मानले आहे.  त्यामुळे  सहाजिकच शैक्षणिक कार्यक्रमामध्ये सरस्वतीचा उदो-उदो केला जाणार.  जर सरस्वती विद्येची देवता असेल  तर तिच्याकडे उच्च-नीच , गरीब-श्रीमंत असला भेदभाव नसला पाहिजे.  मग असे असताना बहुजन समाज तिन-साडेतिन हजार वर्षे शिक्षणापासून वंचित का राहिला.  सरस्वतीने बहुजनांच्या  शिक्षनाच्या दृष्टीने काहीच केले नाही का ? हजारो वर्षापासून सरस्वतीची पूजा विद्येची देवता म्हणून केली जाते.  मग बहुजनाना शिकायला बंदी का होती ?  दूसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सरस्वती हिसुधा एक स्त्री होती, मग स्त्रियानाही शिकायला बंदी का?

तर सांगायचा मुद्दा असं कि आजवर चिकित्सा न केल्यामुळेच बहुजन समाज गुलामगिरीत अडकुल पडला आहे. आणि “होय बा!” वृत्तीमुळे तर तो या दलदलीत खोल रुतत चालला आहे. त्यामुळे विद्येची खरी देवता कोण होवू शकते याचा थोडा चिकित्सक पद्धतीने विचार केला गेला पाहिजे. कारण तमाम बहुजन समाजासाठी शिक्षणाची कवाडे खुली केली ती महात्मा जोतीराव आणि सावित्रीमाई फुले यांनी. पण शाळा महाविद्यालयात त्यांच्या प्रतिमेचे पूजन होत नाही. अनेक शैक्षणिक संस्थामध्ये काल्पनिक देवतांच्या प्रतिमा लावल्या जातात. परंतु ज्यांनी सुरुवात केली त्यांच्या प्रतिमा मात्र नसतात. आणि अशा शाळा, महाविद्यालये किंवा संस्थामधून कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने केली जाते, मात्र ज्या सावित्रीमाईंनी शिक्षणाच्या प्रचार आणि प्रसारासाठी आयुष्य वेचले त्यांची साधी आठवण ही कोणाला होवू नये ? पहिली स्त्री शिक्षिका, स्त्री मुख्याध्यापिका म्हणून सावित्रीमाई सर्वश्रुत आहे. परंतु पहिली स्त्री शिक्षिका कशी घडली याचा कितीजण गांभीर्याने विचार करतात ? ज्यांना काल्पनिक देवावर श्रद्धा ठेवायची असेल त्यांनी जरूर ठेवावी. त्यांच्या भावना आम्हाला दुखवायच्या नाहीत किंवा त्यांना श्रद्धेचा जो अधिकार आहे तो आम्हाला नाकारायचा नाही. परंतु ज्या माउलीने आम्हाला शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली तीच आमच्या दृष्टीने सर्वश्रेष्ठ आहे. तीच आमची खरी विद्येची देवता आहे. कारण जर सावित्रीमाई आणि जोतीराव घडले नसते तर कदाचित भारत आजही अशिक्षित असता. या दाम्पत्यानेच शैक्षणिक क्रांती घडवली हे वास्तव आम्हाला नाकारून चालणार नाही.

आता एकच गोष्ट स्पष्ट करतो.  कोणी देव मानत असेल वा नसेल.  परन्तु देव ही काल्पनिक संकल्पना आहे.  काल्पनिक देव-देवतांची पूजा करायची आणि त्याचवेळी ज्यानी समाजात अमुलाग्र  क्रांती  घडवली त्या महामानवांची मात्र उपेक्षा करायची हे कोणत्याही प्रामाणिक माणसाला पटणार नाही.  हे विचार वाचल्यानंतर वाचकाना मी हिन्दुद्रोही वाटेन.  मी धर्माला, देवाला विरोध करतोय म्हणून भावनिक  बनून ते वरील विचार झिडकारून लावतील.  परंतु  प्रामाणिकपणे बुद्धि जागृत ठेवून विचार करा की कळत नकळत आपण आपल्या महापुरुषांची किती उपेक्षा करतोय.  


ज्यांच्यामुळे  आपण आज शिक्षण घेवु शकतो, त्यांचे विचार जोपासायाचे की आजपर्यंत ज्यानी आपल्या शिक्षणाला  विरोध केला त्यांच्या तालावर नाचायाचे.  निर्णय  सर्वस्वी तुमचा आहे.

हा लेख बहुजन इंडिया या वेबसाईट वार सुद्धा प्रकाशित झाला आहे.  बहुजन इंडिया वरील लेख पाहण्यासाठी इथे  क्लिक करा.6 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes