गुरुवार, फेब्रुवारी ०३, २०११

अंधश्रद्धांचे उदात्तीकरण


हल्ली माणसाच्या भावना कशाने दुखावल्या जातील हे सांगता यायचे नाही. चुकीच्या गोष्टींचे समर्थन करायचे आणि त्याविरुद्ध कुणी बोलले, लिहिले कि आमच्या भावना दुखवल्या म्हणून बोंब मारायची हे नेहमीचेच झाले आहे. त्यामुळे माणसांच्या भावनांचा कितपत विचार करायचा याचा प्रामुख्याने विचार करणे गरजेचे आहे. याचा अर्थ असा नाही कि माणसाच्या भावनेला, त्याच्या श्रद्धेला काहीच किंमत नाही. चांगल्या गोष्टींबद्दल समाजात अनेक जणांची चांगली भावना असते. त्याला विरोध करायचे काहीच कारण नाही. परंतु समाजातील एखाद्या अनिष्ट रूढीचे, प्रथेचे समर्थन समाज करू लागला तर अशा वेळी मात्र त्यांच्या या भावनेचा विचार करून त्या अनिष्ट रुधीविरुद्ध कुणी बोलायचे, लिहायचे नाही हे कोणत्याही सुज्ञ  माणसाला पटणार नाही.
पूर्वी समाजात सतीप्रथा, बालविवाह, केशवपन यासारख्या  अनेक अनिष्ट रूढी अस्तित्वात होत्या. भारतातील समाजव्यवस्था ही  पुरुषप्रधान असल्याने साहजिकच स्त्रियांवर बंधने लादणार्या या परंपरा समाजातील विशिष्ठ लोकांनी तयार केल्या. त्या परंपरा मुठभर लोकांचे हित जोपासणाऱ्या असल्याने या लोकांनी  या परंपरा कशा टिकतील, त्याचे कसे संवर्धन होईल याची नेहमीच काळजी  घेतली आहे. भारतातील अनेक समाजसुधारकांनी या परंपरा नष्ट करण्यासाठी अविरत प्रयत्न केले. नंतर भारतात ब्रिटीशांचा अंमल सुरु झाल्यानंतर मात्र या परंपरा नष्ट करण्यासाठी कायदे निर्माण केले गेले. त्यावेळीही लोकांना इंग्रज सरकारचे आपल्यावरती सामाजिक, धार्मिक आक्रमण वाटत होते. अर्थात ब्रिटीशांच्या इतर धोरणाकडे तात्पुरते दुर्लक्ष केले तर आपणास असे दिसून येईल कि ब्रिटीशांनी कुणाचीही परवा न करता या अन्याय्य चाली बंद करण्यासाठी कडक आणि योग्य धोरण अवलंबले. त्या अनिष्ट प्रथा बंद झाल्याने आपला सामाजिक विकास होण्यास मदतच झाली. जर ब्रिटीशांनी त्यावेळी लोकांच्या भावनांचा विचार करून या प्रथा तशाच चालू ठेवल्या असत्या तर आज समाज कुठे असता ? महत्वाचा मुद्धा हा आहे कि लोकांच्या भावना जर चुकीच्या गोष्टीशी निगडीत असल्या तर आपण केवळ या भावनांचा विचार करून अनिष्ट प्रथांचे समर्थन करायचे का ?
परवा वानखेडे मैदानावर सत्यनारायण पूजेचा विधी करण्यात आला. मग जागृत आणि सामाजिक जाणीव असलेल्या व्यक्तींनी त्या गोष्टीला विरोध केला तर बिघडले कुठे ? साधारण वर्षभरापूर्वी सातार्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात एका नव्या कक्षाचे उद्घाटन  सत्यनारायण पूजेने केले. जर जिल्हाधिकारी कार्यालयातच अशा प्रकारे अंधश्रद्धांचे उदात्तीकरण केले गेले तर सर्व सामान्य जनतेत कोणता संदेश जाईल ? त्यावेळी दैनिक पुण्यनगरीचे  पत्रकार विजय मांडके यांनी या चुकीच्या गोष्टीविरुद्ध वृत्तपत्रातून आवाज उठवला होता. यावेळीही लोकमतचे पत्रकार नितीन सावंत यांनीही या वानखेडे मैदानातील सत्यनारायण पुजेची बातमी वृत्तपत्रात दिली. त्यांचे अभिनंदन करायचे राहिले बाजूला पण त्यांनाच "कोत्या मनाचे पत्रकार" म्हणून हिणवले गेले. म्हणजे आपण चुकीच्या गोष्टीचे समर्थन करत राहायचे आणि  जे त्या गोष्टीना विरोध करतील त्यांना कोत्या मनाचे, असहिष्णू ठरवायचे हा दुटप्पीपणा आहे. पत्रकार हा समाजातील महत्वाचा घटक आहे. त्यांनी सर्व सामान्य लोकांचे प्रतिनिधित्व वृत्तपत्राद्वारे करून अन्याय्य गोष्टीना विरोध केला पाहिजे. पण समाजात असे किती पत्रकार आहेत जे खरोखर समाजहिताची भूमिका घेतात ? पत्रकार आणि प्रसारमाध्यमे यांच्याबद्दल न बोललेलेच बरे. परंतु या नकारात्मक वातावरणात हि विजय मांडके किंवा नितीन सावंत यांच्यासारखे सत्याची चाड आणि अन्यायाची चीड असणारे पत्रकार समाजात आहेत हीच आमच्यासारख्या सर्व सामान्य लोकांच्या दृष्टीने आनंदाची आणि अभिमांची गोष्ट आहे. 

'लोकप्रतिनिधींच्या अंधश्रद्धा' हा लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

5 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes