मंगळवार, जानेवारी ०४, २०११

मडकं फुटकं असणाऱ्या मित्रानो...

खांद्यावर कावड घेवून पाणी आणणं हे त्याचं रोजचंच काम होतं. खांद्यावरच्या बांबूला दोन्ही टोकांना सारख्याच आकाराची दोन मडकी त्यानं दोराने घट्ट बांधली होती. पण त्यातलं एक मडकं व्यवस्थित, चांगलं होतं, तर दुसऱ्या मडक्याला तडा गेला होता. विहिरीवरून पाणी आणताना दोन्ही मडकी तो पाण्यानं गच्च भरायचा. पण घरी परत येईपर्यंत त्यातलं एक मडकं अर्ध गळून गेलेलं असायचं आणि एका खेपेत जेमतेम दीड मडकं पाणी त्याला मिळायचं.
आपण शिगोशिग पाणी आणतो याचा अर्थातच चांगल्या मडक्याला खुपच अभिमान होता, तर तडा गेलेलं मडकं आपल्या कमीपणा बाबत सारखं कुढत असायचं. आपल्यामुळेच मालकाला कमी पाणी घरी न्यावं लागतं याची बोच सारखी त्याच्या मनाला लागून असायची.
एक दिवस आपल्या मनातली खळबळ तो मालकाला बोलून दाखवतोच, ‘माफ करा मला. माझ्यामुळेच तुमची गैरसोय होते याचं मलाही खूप दुखः आहे. माझ्यात जर वैगुण्य नसतं तर कदाचित मीही माझ्या दुसऱ्या मित्रासारखं शिगोशिग जीवन माझ्यात भारून आणू शकलो असतो...’
मालकानं त्याला अर्ध्यातच थांबवलं. म्हणाला, मित्रा, अरे तुझ्यातल्या वैगुण्याबद्दल दुखः का बाळगतोस ? उलट तू तसा आहेस म्हणूनच अधिक उपयोगी आहेस आणि मला तुझा खूप अभिमान वाटतो. जरा बघ आजूबाजूला, माझ्या कावडीच्या ज्या बाजूला तू आहेस, रस्त्याच्या केवळ त्याच बाजूला सुंदर सुंदर फुलं फुललेली आहेत. रस्त्याची दुसरी बाजू मात्र वैराण, रखरखीत आहे. तुला तडा आहे, हे तुझं वैगुण्य नाही तर ते तुझं बलस्थान आहे. तेच मी ओळखलं आणि रस्त्याच्या केवळ या बाजूला फुलं लावली. त्यामुळे नुसता रस्ताच सुंदर झाला नाही, तर त्या फुलांनी माझं घरही सजलंय आणि तेही सुंदर झालंय. उलट तुझ्याशिवाय मीच अपूर्ण आहे.
तात्पर्य : आपल्या सगळ्यात काही ना काही वैगुण्य असतं आणि तेच आपलं वैशिष्ठ्यही असतं. पूर्णता आणि वैगुण्य यांच्या मिश्रणातूनच जीवन सर्वांगसुंदर होत असतं. मडकं फुटकं असणाऱ्या माझ्या साऱ्याच मित्रानं शुभेच्छा.

दैनिक लोकमतच्या मैत्र पुरवणीतून साभार. 
 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes