गुरुवार, जानेवारी २७, २०११

शिवशक्ती आणि भिमशक्तीचा नारा : किती खरा, किती खोटा ?

रामदास आठवले
महाराष्ट्रातील दलित चळवळीतील एक महत्वाचे नेते आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे अध्यक्ष रामदास आठवले यांनी नुकतीच सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची भेट घेतली. या भेटीत बाळासाहेबांनी शिवशक्ती आणि भिमशक्तीच्या एकीकरणाचा नारा दिला. या भेटीत अजून कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली हे गुलदस्त्यात असले तरी या भेटीमुळे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

बाळासाहेब ठाकरे
मुळात बाळासाहेब ठाकरे हे कट्टर हिंदुत्ववादी विचारांचे पाईक. म्हणजे सावरकर ते गोडसे अशा परंपरेचे कडवे समर्थक. आठवलेंची विचारसरणी नेमकी त्याच्या विरोधात. आठवले हे बुद्ध-फुले-शाहू-आंबेडकर परंपरेतील. साहजिकच सावरकरांचा जहाल हिंदुत्ववाद आणि फुले-शाहू-आंबेडकरांचे पुरोगामित्व यांचा कुठेच ताळमेळ लागत नाही. त्यामुळे आठवलेंचा रि.पा.इं. आणि बाळासाहेब ठाकरेंची सेना असे समीकरण अजूनतरी उदयास आलेले नाही. ठाकरे आणि आठवले हे आजपर्यंत एकमेकांच्या विचारांना विरोधच करत आले आहेत. अशा परिस्थितीत आठवलेंना बाळासाहेबांची भेट घेण्याचे आत्ताच का सुचले असावे ? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी गेल्या काही निवडणुकांमध्ये आठवले आणि  रि.पा.इं. यांची झालेली वाताहत आठवावी लागेल. आजपर्यंत रामदास आठवले शरद पवारांशी इमान राखून राहिले. त्यांचे राजकारण पवारांना अनुकूल असेच राहिले आहे. परंतु गेल्या काही निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आठवलेंना असा काही झटका दिला की आठवले चारीमुंड्या चीत झाले. विधानसभेच्या निवडणुकासाठी स्थापन केलेल्या तिसऱ्या आघाडीचा प्रयोग फसला. त्यातही शे.का.प., शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्ष यांनीच आघाडीची काय ती लाज राखली.  शिर्डी लोकसभा मतदार संघामध्ये आठवलेंना नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागला. त्यानंतर आठवलेंनी राज्य सभेसाठी प्रयत्न केले, परंतु तेही व्यर्थ ठरले. साहजिकच आठवलेंची अवस्था ना घर का, ना घाट का..अशी झाली. त्यामुळे साहजिकच काँग्रेस-राष्ट्रवादी आपल्याला डावलत आहे अशी आठवलेंची मानसिकता झाली.

सेनाप्रमुखांची भेट ही पवारनिती ?

शरद पवार
शरद पवार हे देशाच्या राजकारणातील एक धुरंदर व्यक्तिमत्व. कॉंग्रेसला अडचणीत आणण्यासाठी ते काय करतील ते सांगता यायचे नाही. त्यांचे राजकारण भल्याभल्यानाही कळत नाही असे त्यांच्याबाबतीत बोलले जाते. जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीत एखाद्या मुद्द्यावर चर्चा चालू असेल आणि काँग्रेसवर दबाव आणायचा असेल अशा वेळी पवारसाहेब नेमके सेनाप्रमुखांच्या भेटीला. किंवा काहीतरी अशी विधाने करणार की काँग्रेस एक पाऊल मागे. त्यामुळे आपल्या सहकारी पक्षावर कसा दबाव आणायचा हे शरद पवारांच्याकडूनच शिकावे. आठवले आजपर्यंत शरद पवारांचे सहकारी राहिल्यामुळे साहजिकच त्यांनी पवारांचा कित्ता गिरवला नसेल कशावरून ? सध्याच्या राजकारणात आठवलेंचे पानिपत झाले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीही आठवलेंना विचारत नाही. अशा परिस्थितीत या पक्षांवर दबाव आणण्याच्या दृष्टीने आठवलेंनी सेनाप्रमुखांची भेट घेतली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण आपल्या हक्काची दलित मते सोडायला काँग्रेस आणि राष्ट्रवादी तयार होणार नाहीत हे आठवलेंनाही ठावूक आहे. कारण आता मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकांचे वेध अनेकांना लागले असतील. या निवडणुकीत आठवलेंना सोडायचा मुर्खपणा काँग्रेस-राष्ट्रवादी करणार नाही.

रिडल्स प्रकरणातील सेनेची भूमिका आठवले विसरले काय ?

रिडल्स प्रकरणावरून एकेकाळी महाराष्ट्रात मोठे वादळ उठले होते. त्यावेळी रिडल्स प्रकरणात सेनेने आणि सेनाप्रमुखांनी कोणती भूमिका घेतली ते आठवलेंनी नीट आठवावे. बाबासाहेबांचे, त्यांच्या विचारांचे आजपर्यंत सेनेने कधीही समर्थन केले नाही. उलट वेळोवेळी बाबासाहेबांच्या विचारांना विरोधच केला आहे. रिडल्स प्रकरणातही नेमके हेच झाले. त्यावेळी महाराष्ट्रभर दलित समाजाच्या आणि बाबासाहेबांच्या विरोधात कुणी वातावरण निर्मिती केली याचा इतिहास आठवले विसरले तरी बाबासाहेबांचे सच्चे अनुयायी कधीच विसरणार नाहीत. बाबासाहेबांचा विचार हा अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी आहे. अशा महामानवाच्या विचाराला नेहमी आपल्या उक्ती आणि कृतीतून विरोध करणाऱ्या लोकांबरोबर आपले वैचारिक नाते जुळू शकते काय याचाही आठवले साहेबांनी विचार करावा.

आठवलेंनी सेनाप्रमुखांची भेट घेतली आणि सेनाप्रमुखांनी शिवशक्ती-भीमशक्तीचा नारा दिला. यातील शिवशक्ती दादोजी कोंडदेव पुतळा प्रकरणात कोणाच्या बाजूने होती. जेम्स लेनने जिजाऊ आणि शिवरायांची बदनामी केली, त्याच्या निषेधार्त ही शिवशक्ती रस्त्यावर उतरली नाही, परंतु दादोजी कोंडदेव चा पुतळा हलवल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रभर राडा ( हा शब्द त्यांचाच बरं का ! ) केला. रिडल्स प्रकरणात याच शिवशक्तीने कसे भिमप्रेम दाखवले तेही महाराष्ट्राला ठावूक आहे. बाबासाहेबांच्या विचारांशी या शिवशक्तीला काहीही देणेघेणे नसते. परंतु बाबासाहेबांचे गुरु कसे ब्राम्हण होते हे सांगण्यासाठी ते जीवाचा आटापिटा करतात.

ही तथाकथित शिवशक्ती आहे तिला खरेतर शिवरायांच्या नावाशी जोडणेच चुकीचे आहे. अर्थात त्यातीत बहुजन तरुणांना शिवरायांबद्दल नितांत आदर असतो. परंतु चुकीच्या मार्गाने गेल्याने त्यांच्यावर खोटा इतिहास लादला जातो आणि तेही आंधळेपणाने तो इतिहास स्वीकारतात. आणि त्यामुळे वेळोवेळी ते आपल्याच माणसांवर हात उगारायला कमी करत नाहीत. मग अशा परिस्थितीत शिवशक्ती आणि भीमशक्तीचा नारा म्हणजे केवळ हवेतील बुडबुडेच नाहीत का ? कारण ही तथाकथित शिवशक्ती + भीमशक्ती असणार आहे तिला ना शिवरायांशी देणेघेणे असणार ना बाबासाहेबांशी ही वस्तुस्थिती आहे. आठवलेंनी त्यांना योग्य वाटेल तो निर्णय घ्यावा मात्र महाराष्ट्रातील बहुजन, दलित कार्यकर्त्यांनी मात्र शिवशक्ती आणि भिमशक्तीचा नारा किती खरा; किती खोटा याचा जरूर विचार करावा.

13 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes