रविवार, जानेवारी २३, २०११

महान क्रांतिकारक : संगोळी रायन्ना

संगोळी रायन्ना
संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात महाराष्ट्रातील एक विद्वान म्हणायचे, “इतर राज्यांना फक्त भूगोल आहे, पण महाराष्ट्राला भूगोलासह इतिहासही आहे.” स्वताचा गौरव कुणाला आवडणार नाही. त्यामुळे सहाजिकच त्यांच्या या वक्तव्यावर आपल्या धडावर दुसऱ्यांचे डोके असणाऱ्या महाराष्ट्रातील बहुजन समाजाने मनापासून टाळ्या वाजवल्या. स्वताचा गौरव करणे ही काय वाईट गोष्ट नाही. परंतु या गौरवाला अहंकाराचा स्पर्श झाला तर इतिहासाचे विकृतीकरण व्हायला वेळ लागत नाही. या संकुचित प्रवृत्तीनीच छ. शिवराय आणि महाराष्ट्रातील अनेक समाजसुधारक, क्रांतिकारक यांना महाराष्ट्रापुरते संकुचित करून टाकले. त्यांचा आदर्श, त्यांचे चरित्र इतर राज्यातील लोकांपर्यंत नीट पोहचू दिले नाही. आपला सामाजिक, राजकीय स्वार्थ साधण्यासाठी या महामानवांच्या नावाचा, कर्तुत्वाचा दुरुपयोग केला गेला. परिणामी या महामानवांच्या कर्तुत्वाला जे राष्ट्रीय आणि सर्वसमावेशक स्वरूप लाभायला पाहिजे होते ते लाभले नाही. त्याच प्रमाणे दुसऱ्या राज्यातील महामानवांचे कर्तृत्वही महाराष्ट्रातील जनतेला समजू दिले नाही. एकीकडे भारत एकसंध राहावा असे तोंडाने बोलून दाखवायचे आणि दुसरीकडे इतर राज्यांना फक्त भूगोल आहे म्हणून त्यांचा गौरवशाली इतिहास नाकारायचा अशी दुटप्पी खेळी या तथाकथित विद्वानांनी खेळली. त्यामुळे महाराष्ट्राला ज्याप्रमाणे छ. शिवरायांचा इतिहास आहे त्याप्रमाणे कर्नाटकला ही राणी चेनम्माचा इतिहास आहे हे आपण विसरून गेलो. निदान आतातरी बहुजन समाजाने देशातील सर्व महामानवांच्या कर्तुत्वाचा योग्य तो गौरव करायला हवा.

आजवर जे महापुरुष उपेक्षित राहिले त्यात कर्नाटक मधील संगोळी रायन्ना यांचा क्रमांक फार वरचा आहे. कर्नाटक वगळता इतर ठिकाणी बहुतांशी लोकांनी संगोळी रायन्ना हे नावही ऐकलेले नसणार. त्यामुळे संगोळी रायन्ना यांच्या उज्वल कार्याची थोडक्यात ओळख महाराष्ट्रातील लोकांना करून देत आहे.

संगोळी रायन्ना हे भारतातील प्रमुख स्वातंत्र्य सेनानी होते. त्यांचा जन्म १५ ऑगस्ट १७९८ रोजी कित्तूर (कर्नाटक) मधील संगोळी या छोट्या गावात एका कुरुबा/धनगर कुटुंबात झाला. लहानपणापासूनच संगोळी रायन्ना हे काटक आणि धाडसी होते. याच गुणांचा फायदा त्यांना ब्रिटीशांविरुद्ध लढताना झाला. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी ब्रिटीशांशी निकराची झुंज दिली.

कित्तुरचे युद्ध-

राणी चेन्नम्मा
कित्तूर या राज्याची राणी होती राणी चेन्नम्मा. तिचा विवाह मल्लासर्जा यांच्याशी झाला होतं. त्यांना एक मुलगा होता. परंतु १८२४ मध्ये त्याचे निधन झाले. त्यामुळे राणी चेन्नम्मा ने शिवलिंगप्पा याला दत्तक घेतले आणि गादीवर बसवले. परंतु ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी ने या दत्तकपुत्राला मान्यता दिली नाही आणि त्याची सिंहासनावरून हकालपट्टी केली. परंतु स्वाभिमानी राणी चेन्नम्मा ने ब्रिटीशांविरुद्ध युद्ध पुकारले. हेच ते कित्तुरचे युद्ध. या युद्धात राणी चेन्नम्मा स्वतः घोड्यावर बसून ब्रिटीशांशी लढली. यावेळी राणी चेन्नम्माचा प्रमुख सेनापती होता संगोळी रायन्ना. संगोळी रायन्नानेही पराक्रमाची शर्थ केली. परंतु दुर्दैवाने राणी चेन्नम्माला बेल्लोन्गाल च्या किल्ल्यावर पकडण्यात आले. तिचा मृत्यू २१ फेब्रुवारी १८२९ रोजी झाला.

संगोळी रायन्ना
त्यानंतर मात्र संगोळी रायन्नाने गनिमी काव्याने ब्रिटिशांना चांगलीच झुंज दिली. त्याने गोरगरीब, सामान्य प्रजेतून सैन्य उभे केले. त्यांच्या मदतीने सरकारी मालमत्तेवर हल्ले कारणे, ब्रिटिशांचा खजिना लुटणे, जे सावकार आणि जमीनदार गरिबांना लुबाडत होते त्यांचे जमिनीची कागदपत्रे जाळून टाकणे अशा प्रकारे संगोळी रायन्नाने सामान्य जनतेला उठाव करण्यास प्रोत्साहित केले. परंतु फितुरी आणि दगा हे भारतीय समाजावरील कलंक आहेत. अखेर दगा करूनच ब्रिटीशांनी संगोळी रायन्ना यांना पकडले. स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावणारा एक थोर योद्धा जेरबंद झाला होता. जेव्हा संगोळी रायन्ना यांना पकडण्यात आले तेव्हा त्यांच्या तोंडी शब्द होते, “या भूमीवर परत एकदा जन्म घेवून ब्रिटिशांना या देशातून हाकलून लावणे हीच माझी शेवटची इच्छा आहे.” मरण समोर दिसत असूनही आपल्या मातीच्या स्वातंत्र्यासाठी पुन्हा एकदा जन्म घेण्याची इच्छा बाळगणारे संगोळी रायन्ना खरोखर थोर क्रांतिकारक होते.

संगोळी रायन्ना यांच्या कार्यावर चित्रपटचीही निर्मिती
अखेर २६ जानेवारी १८३१ रोजी संगोळी रायन्ना यांचा मृत्यू झाला. त्यांच्या संघर्षाचे मोल मात्र आम्ही साफ विसरून गेलो. कर्नाटक मध्ये मात्र काही प्रमाणात त्यांच्या स्मृती जपण्याचे कार्य सुरु आहे. हुबळी येथे संगोळी रायन्ना यांचा १३ फुटी ब्रांझ चा पुतळा आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर संगोळी रायन्नाच्या कार्याचा प्रसार करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात. संगोळी रायन्ना यांच्या कार्यावर एका चित्रपटचीही निर्मिती करण्यात आली आहे. संगोळी रायन्ना यांचे कार्य फक्त कर्नाटक पुरते मर्यादित न ठेवता त्याला सर्व भारतभर पसरवण्यासाठी संघटीत प्रयत्न करणे गरजेचे आहे. 

२६ जानेवारी हा संगोळी रायन्ना यांचा स्मृतीदिन. भारतीय स्वातंत्र्यासाठी आपल्या जिवाचीही परवा न करता अखेरच्या श्वासापर्यंत संघर्ष करणाऱ्या या महान क्रांतिकारकाला विनम्र अभिवादन.

13 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes