सोमवार, जानेवारी १७, २०११

अहिल्या देवींबाबत शासकीय माहितीत चुका

अहिल्यामाई होळकर
केंद्र सरकारच्या डाक-तार विभागाने दोन रुपये किमतीचे अहिल्यादेवींचे तिकीट जारी केले. या तिकीटासोबत वितरीत केल्या गेलेल्या माहिती पत्रकामध्ये अनेक चुका आहेत. त्या पुढीलप्रमाणे-


चूक क्र. १- अहिल्याबाई मल्हारराव होळकरांची 'मुलगी' होती.
वस्तुस्तिथी- प्रत्यक्षात अहिल्यादेवी मल्हाररावाची सून होती. मल्हाररावांच्या मुलाशी म्हणजे खंडेरावशी तिचा विवाह झाला होता. अहिल्याबाईंचे  वडील चौंडी (नगर) चे माणकोजी शिंदे होते. विशेषत्वाने मी नमूद करतो कि, १९७५ साली पंचवीस पैशाचे टपाल तिकीट अहिल्याबाईंच्या नावाने जारी केले होते. तेव्हा सरकारने माहितीपत्रकात अहिल्यादेवी मल्हाररावांची सून होती असेच छापले होते. तसेच १९९६ ऑगस्ट मध्ये त्याच्या दोनशेव्या स्मृतिदिनानिमित्त विशेष टपाल तिकीट जारी केले होते. त्यातही विस्तृत वर्णन करून मल्हाररावांचे सुपुत्र खंडेराव यांच्या पत्नी अहिल्याबाई असा स्पष्ट उल्लेख केला होता. विशेष म्हणजे १९७५ च्या तिकिटाचे प्रकाशन तत्कालीन दूरसंचार मंत्री डॉ. शंकर दयाळ शर्मा यांचे हस्ते झाले होते. १९९६ व २०१० च्या दोन्ही तिकिटांची माहितीपत्रक अलका शर्मा यांच्या सहीने प्रसिद्ध झाले आहेत.


२. इंदूर संस्थानाचे संस्थापक राव नंदलाल चौधरी जमीनदार होते.
वस्तुस्तिथी - मोघल शासनाचे सुभेदार वजीर खान ताहीर खुरासानी यांनी जमीनदार बलराम चौधरी याला 'जमीनदारी' वतन दिले होते. बलारामची हत्या झाली. त्यानंतर त्याचा मुलगा चुडामण याला चौधरी पदवी मिळाली. चुडामानाच्या मृत्युनंतर शहजादा आजम याने आदेश दिला कि नंदलाल मंडलोई याला 'चौधरी' पद बहाल केले आहे; परंतु केवळ त्यामुळे नंदलाल ने इंदूर संस्थान स्थापन केले असे म्हणणे पूर्णतः चुकीचे आहे.  कारण नंदलाल ने फक्त 'नंदालालपुरा' मोहल्ला तेथे बसवला होता. नंदलाल हा 'क्याम्पेल' चा जहागीरदार होता. 'क्याम्पेल' विभाग उज्जैन परगण्यात मोडत होता.त्यामुळे नंदलाल इंदूर संस्थानाचा संस्थापक होता, हे इतिहासाला धरून नाही.


३. पेशव्यांनी मन्डलोइला चौधरी पद बहाल केले.
वस्तुस्तिथी- इंदुरात मल्हारराव होळकरांची हुकुमत चाले. त्यानंतर नंदलाल मन्डलोइला पेशव्यांनी चौधरी पद बहाल केले याला ऐतिहासिक पुरावा नाही.


४. १८८५ ते १९०६ या काळात डाक तिकिटे जारी केली होती.
वस्तुस्तिथी- १९०६, १९२८, १९३३, १९३४, १९३६, १९४३ व १९४७ साली होळकर संस्थानाने टपाल तिकिटे, रेव्हेन्यू स्टांप जारी केले होते. श्रीमंत यशवंतराव होळकर व श्रीमंत तुकोजीराव होळकर यांच्या कार्यकाळात हि टपाल तिकिटे जारी केली होती. इंदूर संस्थानासाठी सदर टपाल तिकिटे फारकिंस  बेकन आणि कंपनी, लंडन व टाईम्स औफ इंडिया प्रकाशनाने मुद्रित केली होती. चुकांची दुरुस्ती करून सुधारित माहितीपत्रक जारी करावे. जगात 'अद्वितीय' असणाऱ्या अहिल्यादेवींचा इतिहास 'बिघडवणार्या' अधिकाऱ्यांची त्वरित चौकशी करून योग्य शिक्षा व्हावी व चुकीच्या माहितीपत्रका बद्दल सरकारने जाहीर माफी मागावी, असे निवेदन होळकर महासंघातर्फे पंतप्रधानांना देण्यात आले आहे. 
लेखक- डॉ. सुधीर तारे
संदर्भ- दै. सकाळ, दि. १५ जानेवारी २०११

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes