गुरुवार, जानेवारी ०६, २०११

महाराष्ट्रातील सामाजिक परिस्थिती आणि इतिहासाचा विपर्यास करणारा लेख

दै. पुण्यनगरीमधील विजय सामंत 
यांचा लेख
दै. पुण्यनगरी मध्ये ५ जानेवारी २०११ रोजी प्रकाशित झालेला विजय सामंत यांचा ‘हे राज्य मराठी कि मराठा’ हा लेख महाराष्ट्रातील सामाजिक परिस्थिती, इतिहास यांचा विपर्यास करणारा व एकांगी आहे. सदर लेख लिहिताना लेखकाने पूर्वग्रह मनात ठेवून लेखन केले आहे हे स्पष्टपणे जाणवते. आजवर ज्यांनी इतिहास लेखनात अनेक लबाड्या केल्या आणि स्वताचा जातीय अहंकार फुलवत ठेवला त्याना अभय देवून जातीयवाद आणि इतिहासातील विकृतीविरोधात लढा उभारणाऱ्या संभाजी ब्रिगेडला लेखक जातीयवादी ठरवतात.

समाजातील कोणत्याही चांगल्या गोष्टीचे श्रेय देताना ‘सर्व जाती-धर्माचे’ अशी व्यापक भूमिका घेतल्याचे सोंग आणायचे आणि मराठा-बहुजानावर जातीयवादाचा घाणेरडा आरोप करायचा हीच खरेतर मनुवादी विचारसरणी आहे. ब्राम्हणांनी इतिहासाचे विकृतीकरण केले, त्यांनी बहुजनांना गुलाम बनवले अशा पद्धतीची मांडणी बहुजन संघटनांनी केली तर त्यांच्यावरही जातीयवादाची सडकी लक्तरे चढवून मोकळे व्हायचे हे आधुनिक पुरोगामित्व महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणात फोफावले आहे. जेम्स लेन प्रकरणात ज्यांनी जेम्स लेनला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मदत केली, पाठीशी घातले त्यांचा जातीवाद सामंत यांना दिसला नाही ?

सामंत म्हणतात, ‘तोंडी फुले-शाहू-आंबेडकर यांचा जप करत ब्राम्हणी मनूचा निषेध करायचा आव आणायचा, पण प्रत्यक्षात मात्र ‘स्वजातीचा अभिमान’ कुरवाळत बसायचे.’ गेल्या पाच हजार वर्षातील सामाजिक परिस्थिती जर अभ्यासली तर स्वजातीचा अभिमान कोण कुरवाळत आहे ते सहज लक्षात येईल. परंतु पूर्वग्रहाची झापडे ज्यांनी डोळ्यावर चढवलीत त्याना हा ‘स्वजातीचा अभिमान’ दिसणार नाही. जेम्स लेन प्रकरणात त्याला मदत करणारे कोण होते, मराठा बहुजन कि संस्कृती आणि इतिहासाचे तथाकथित ठेकेदार ?  जेम्स लेनने विनोद म्हणून जो बदनामीकारक मजकूर लिहिला त्याच्यामागची जातीय अहंकाराची मुळे इथल्याच मातीत रुजली आहेत ती सामंत यांना शोधून काढावीशी वाटली नाही ?

हेच ते वादग्रस्त पुस्तक
तो विनोद कोणत्या जातीय अहंकारातून आणि अभिमानातून निर्माण झाला होता ? दादोजी कोंडदेव आणि रामदास हे शिवरायांचे गुरु नसताना त्याना गुरुपद बहाल केले. त्याच्या आधारे आई जिजाऊ आणि शिवछत्रपती यांची बदनामी केली तो कोणाचा जातीय अहंकार होता ? आम्हीच श्रेष्ठ. बाकीचे शूद्र. दुसर्याना काहीच काळात नाही. आम्ही जो सांगू तोच इतिहास, तीच संस्कृती आणि तोच धर्म. हा कोणत्या जातीय अभिमानाचा भाग आहे ? फुले-शाहू-आंबेडकर यानाही त्यांच्या काळात ब्राम्हणद्वेष्टे म्हणून हिणवले गेले. या महामानवाना अतोनात त्रास दिला, हा कोणत्या जातीचा अभिमान होता ? दादोजी कोंडदेव आणि रामदास यांना शिवरायांच्या गुरुपदी बसवण्याचा प्रयत्न याच जातीय अहंकारातून झाला आहे. आपला माणूस सर्वश्रेष्ठ स्थानी पाहिजे. इतर जातीच्या व्यक्ती श्रेष्ठ ठरूच शकत नाहीत. आणि त्यातूनही कोणी आपले श्रेष्ठत्व सिद्ध केलेच तर त्याना ब्राम्हण गुरुशी जोडायचे आणि आमचे मार्गदर्शन होते म्हणूनच....नाहीतर तुमची काय किंमत होती ? असा अविर्भाव आणायचा, अशा प्रकारच्या लबाड्या इतिहास लेखनात नेहमीच केल्या गेल्या. मात्र सामंत यांना त्या लबाड्या दिसल्या नाहीत. त्यानां फक्त संभाजी ब्रिगेड आणि खेडेकर-कोकाटेंचा तथाकथित जातीयवाद दिसतो. स्वजातीचा अभिमान बहुजनांनी कधीच कुरवाळला नाही. मात्र तरीही बहुजनांच्या सामाजिक स्वातंत्र्य लढ्याला स्वजातीचा अभिमान म्हणून हिणवायचे हा खरेतर मनुवाद आहे.

भांडारकरवर कारवाई करणारे 
संभाजी ब्रिगेड चे कार्यकर्ते


सामंत यांनी पुरुषोत्तम खेडेकर आणि श्रीमंत कोकाटे यांच्यावर शाब्दिक कोट्या करत ते जातीय द्वेष पसरवत असल्याचा आरोप केला. शाब्दिक कोट्या करण्यात लेखणी झीजवण्यापेक्षा खेडेकर-कोकाटे यांचे काय चुकले ते सामंत यांनी दाखवून दिले असते तर ते अधिक संयुक्तिक ठरले असते. मात्र ज्यांच्या मनातच पूर्वग्रह आहे आणि ज्यांना ‘संभाजी ब्रिगेड’ या नावाचीच अलर्जी आहे त्यांच्याकडून अजून कोणत्या लिखाणाची अपेक्षा करणार ? फुले-शाहू-आंबेडकरांनी त्यांच्या काळात जो समतेचा लढा उभारला त्यालाही ब्राम्हणद्वेष चीटकावणाऱ्या प्रवृत्ती होत्याच कि. नंतरच्या काळात त्यांच्या आंदोलनाचे सकारात्मक परिणाम समाज व्यवस्थेवर दिसून आल्यानंतर समाजाला त्यांच्या विचाराचे आणि कार्याचे महत्व पटले. मात्र जिवंतपणी त्यानां या प्रवृत्तींनी त्रासच दिला ना ? त्यांच्या कार्यालाही जातीयवाद म्हणूनच हिणवले गेले. त्या हिणवणाऱ्या प्रवृत्ती जशा त्या काळात होत्या तशा आत्ताही आहेतच. फरक इतकाच आहे कि फुले-शाहू-आंबेडकरांना जातीयवादी म्हणणे शक्य नाही म्हणून त्यांच्या विचाराने वाटचाल करणाऱ्या संघटना, व्यक्ती यांना जातीयवादी म्हणायचे. बहुजन महापुरुषांची बदनामी केली तरी यांना चालते, मात्र बदनामीला विरोध कारणे जातीयवाद ठरतो.
लाल महालातील हा पुतळा हटवला
इतिहास हा आम्ही सांगू तसाच असला पाहिजे ? असा दावा संभाजी ब्रिगेड ने तरी कधी केला नाही. (सामंत यांनी हा शोध कुठून लावला हे त्यांनाच माहित असेल) इतिहासातील अनेक वादावर संभाजी ब्रिगेड ने नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्या भूमिकेच्या समर्थनार्थ पुरावे देण्याचीही त्यांची तयारी आहे. दादोजी कोंडदेव वाद असो नाहीतर रामदासांचा वाद असो. ते शिवरायांचे गुरु नव्हते अशा प्रकारचे संशोधन आता पुढे आले आहे. त्यासंदर्भात पुणे व इतर ठिकाणी चर्चेचे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. आज पर्यंतच्या नावाजलेल्या इतिहासकारांनी मात्र या चर्चेत सहभागी होवून पुरावे सादर करण्याचे टाळले. (दै. पुण्यनगरीनेही या संदर्भात अग्रलेख लिहून इतिहासातील प्रश्नापासून पळ काढणाऱ्या संशोधकांना चांगलेच खडसावले होते. आणि अशा प्रकारच्या चर्चेचे आयोजन करण्याचीही तयारी दर्शवली होती. संभाजी ब्रिगेडने आपला होकार कळवला होता मात्र तथाकथित, पुणेरी विद्वानानानी दै. पुण्यनगरीच्या या प्रस्तावावर मुग गिळून गप्प राहणेच पसंद केले. ) जर पुरावेच असतील तर ते सदर का केले जात नाहीत ? शासनाने नेमलेल्या समितीतही हे लोक पुरावे देवू शकत नसतील तर संभाजी ब्रिगेड च्या लढ्याला जातीयवाद म्हणण्याचा अधिकार त्याना आहे का ? यांनी इतिहासात आजवर ज्या लबाड्या केल्या त्या पचवता-पचवता यांना नाकीनऊ आले आहे. मग अशा ढोंगी प्रवृत्तींना विरोध कारणे हा जातीयवाद कसा काय ठरू शकतो ?

जेम्स लेन वेळी अशी तत्परता
का दाखवली नाही
लेखाचे शीर्षकच हे राज्य मराठी कि मराठा ? असे आहे. म्हणजे माडखोलकरांनी ज्या जातीयवादी  भावनेतून हा प्रश्न विचारला तो सामंत यांना दिसला नाही. मात्र यशवंतराव चव्हाण यांनी कसा ‘मराठा’ काडीचा वापर केलं हे सांगण्यातच सामंत यांना अधिक रस आहे असे दिसते. सामंत म्हणतात शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्या राजकीय टोळ्याच या महाराष्ट्रात आहेत. शिवाजी महाराजांना जातीय आणि प्रादेशिक कुंपणात कोणी अडकवून ठेवले आणि महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्या राजकीय टोळ्या कोणाच्या आहेत हे उभ्या महाराष्ट्राला ठावूक आहे. कारण जेव्हा जिजाऊ आणि शिवछत्रपतीची बदनामी झाली तेव्हा या टोळ्या मुग गिळून गप्प बसल्या होतं. ज्यांनी दादोजी कोंडदेवच्या पुतळ्यावरून पुण्यात स्वताच्या संस्कृतीला साजेल असं ‘राडा’ केलं ते जिजाऊ आणि शिवरायांच्या बदनामी विरोधात का रस्त्यावर आले नाहीत ? त्यांचे हे दुटप्पी वागणे पाहून त्यानां जाब विचारावा असे सामंत यांना वाटले नाही का ? (दै. पुण्य नगरीने मात्र अग्रलेख लिहून अशा प्रवृत्तींना जाब विचारला. पुण्यनगरीचा अग्रलेख- 'जेम्स लेन वेळी कोठे' होता वाचण्यासाठी क्लिक करा.) तेव्हा संभाजी ब्रिगेडचीच पोरं छातीचा कोट करून पुढे आली होती. तरीही सामंत यांना महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्या राजकीय टोळीत संभाजी ब्रिगेडची पोरं दिसली तर नवल वाटायला नको.

1 टिप्पणी(ण्या):

Kantilal म्हणाले...

महान क्रांतिकारक संगोळी रायन्ना यांच्या बाबत माहितीपर 'धडा' पाठ्यपुस्तकात असणे आवश्यक आहे.

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes