शुक्रवार, जानेवारी १४, २०११

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण ?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर
परवा औरंगाबादला म्हणे राज ठाकरेंची “प्रचंड मोठी” सभा झाली. ( म्हणजे तसे टी. वी. वाले आणि पेपर वाले सांगत होते. त्या सभेचे थेट प्रक्षेपण महाराष्ट्रभर दाखवले. पण राज ठाकरेंच्या सभेच्या ठिकाणापासून एका तासाच्या अंतरावर असलेल्या सिंदखेड राजा येथे जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्यासाठी राज ठाकरेच्या सभेला जितकी गर्दी होती त्याच्या पाचपट गर्दी असूनही एकाही प्रसारमाध्यमाने त्यांची दखल घेतली नाही. लेख वाचा 'प्रसारमाध्यमांचा पक्षपातीपणा' ) त्या सभेत राज ठाकरेनी बोलण्याच्या ओघात अतिशय खोटारडे विधान केले. बहुजन समाजातील महामानवांचा सत्य इतिहास दडपून जातीयवादी इतिहास लादण्याचे प्रयत्न कसे होतात त्याचे ते विधान म्हणजे उत्तम नमुना होय.
राज ठाकरेसध्या दादोजी कोंडदेव पुतळ्यावरून जो वाद महाराष्ट्रभर सुरु आहे, त्याला प्रत्युत्तर म्हणून जाणून बुजून बहुजन समाजाची दिशाभूल राज ठाकरेनी सुरु केली आहे. परवाच्या सभेत राज ठाकरे म्हणाले, “बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु ब्राम्हण होते, त्यानाही तुम्ही हटवणार का ?” आता या प्रश्नाचे उत्तर स्वत बाबासाहेबच देवू शकले असते. पण आज बाबासाहेब नाहीत म्हणजे त्यांचे नाव घेवून, त्यांच्या इतिहासाचा विपर्यास करून दिशाभूल करण्याच्या षडयंत्राची पायाभरणी राज ठाकरे यांनी केली. पण बाबासाहेब हे अतिशय दूरदृष्टी असणारे विचारवंत होते. ज्याप्रमाणे मनुवाद्यानी शिवाजी महाराजांचे गुरु बदलले, तसाच प्रकार आपल्या बाबतीत सुद्धा होवू शकतो हे बाबासाहेबांनी ओळखले असावे. कारण बाबासाहेबांनी त्यांच्या तीन गुरूंची नावे आपल्या पुस्तकातून, विचारातून सांगितली आहेत. बाबासाहेबांचे ते गुरु म्हणजे सर्वोत्तम भूमिपुत्र गोतम बुद्ध, संत कबीर आणि क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले. (आतातर संत कबीर हेसुद्धा ब्राम्हण होते असे सांगण्याचा आटापिटा काहीजण करत असतात.) बाबासाहेबांनी या तीन महापुरुषांना स्वताचे गुरु म्हणून सन्मान दिला असतानाही राज ठाकरे कशाच्या आधारावर त्यांचे गुरु ब्राम्हण होते हे सांगत आहेत ?  

बाबासाहेबांचे गुरु कोण हे ठरवण्याचा अधिकार बाबासाहेना कि राज ठाकरेंना ? राज ठाकरेनी बाबासाहेबांची पुस्तके वाचावीत म्हणजे त्याना बाबासाहेबांचे खरे गुरु समजतील. उगीच बहुजन समाजाची दिशाभूल करण्यात काय अर्थ आहे. पण हे जे षडयंत्र आहे ते बहुजन समाजाने ओळखण्याची गरज आहे. बहुजन महामानावांचा इतिहास कसा बदलला जातो त्याचा बहुजनांनी अभ्यास करावा. 

छ. शिवरायानीही आपल्या हयातीत दादोजी कोंडदेव किंवा रामदास यांना गुरु म्हटलेले नाही. शिवरायांनी कवी परमानन्दाकडून जे “शिवभारत” नावाचे शिवचरित्र लिहून घेतले त्यात कुठेही दादोजी कोंडदेव किंवा रामदास यांचा गुरु म्हणून उल्लेख नाही. आणि इतर समकालीन कागदपत्र, ऐतिहासिक दस्तऐवज, समकालीन ग्रंथ इ. मध्ये सुद्धा दादोजी कोंडदेव आणि रामदास हे शिवरायांचे गुरु आहेत असा कुठेही उल्लेख नाही. सध्या जे लोक दादोजीना शिवरायांच्या गुरुपदी बसवण्याचा अट्टहास करत आहेत ते खोट्या बखरी आणि काल्पनिक कादंबऱ्यांचा आधार घेत आहेत. इतिहास हा कल्पनेवर आधारित नसून तो वास्तव आहे हे भानही त्यांनी ठेवले नाही. त्यामुळेच दादोजींना शिवरायांच्या गुरुपदी बसवण्याचा केविलवाणा प्रयत्न ते करत आहेत. दादोजी ब्राम्हण होते म्हणून त्यांचा पुतळा हटवला हे साफ खोटे आहे. त्यांचे तथाकथित गुरुत्व कुणीही सिद्ध करू शकले नाही त्यामुळे त्यांचा पुतळा काढण्यात आला हे वास्तव आहे. त्यामुळे बाबासाहेबांचे गुरु जरी ब्राम्हण असते तरी त्याना हटवण्याचा संबंध येत नाही. बाबासाहेबांना शिकवायला त्यावेळी ब्राम्हण शिक्षक जरूर असतील पण गुरु आणि शिक्षक यातील फरक राज ठाकरेनी नीट समजून घ्यावा.

गोतम बुद्ध, संत कबीर आणि महात्मा जोतीराव फुले या तिघांची बाबासाहेबांशी कधीही भेट झाली नाही. त्यांचा कार्यकाल बाबासाहेबांच्याही आधीचा आहे. तरीही बाबासाहेबांनी त्याना गुरूचा दर्जा दिला. कारण या तिघांनीही बाबासाहेबांना जगण्याचे तत्वज्ञान आपल्या विचारातून आणि लेखनातून दिले. बाबासाहेब घडले त्यात या तिघा महामानवांचा फार मोठा वाटा आहे. आणि हे बाबासाहेबानीच आपल्या लिखाणातून कृतज्ञापूर्वक नमूद केले आहे. असे असतानाही राज ठाकरे इतकी आश्चर्यकारक विधाने करत आहेत.  यात त्यांचा राजकीय हेतू आहे मात्र त्यासाठी बहुजन महामानवांचा इतिहास वेठीस का धरला जातो ? हे नुसते राजकारण आहे असे समजणे मूर्खपणाचे होईल. यापाठीमागे फार मोठे षडयंत्र आहे ते बहुजन समाजाने ओळखले पाहिजे. आणि अशा प्रकारचे षडयंत्र ओळखण्यासाठी बहुजनांची नजर ही ‘फुले-शाहू-आंबेडकरवादी’ च असली पाहिजे. बहुजनानो फुले-शाहू-आंबेडकर वाचा, समजून घ्या आणि विचार करा.

33 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes