मंगळवार, जानेवारी ०४, २०११

वाळू आणि दगड


मैत्री अशीच तर असते.
दोन मित्र. रस्त्याने चाललेले असतात. बोलता बोलता त्यांच्यात जबर भांडण होतं. वाद पेटतो. दोघांचीही डोकी तापतात आणि राग अनावर होवून एक मित्र दुसऱ्याच्या श्रीमुखात भडकावतो.
आपल्या मित्रानं एवढ्या तेवढ्या कारणानं आपल्यावर हात उचलला, हे काही त्या बिचाऱ्या मित्राला आवडलं नाही. पण तो गप्प बसला. संतापून हात तर अजिबात उचलला नाही. चालता चालता तो फक्त थांबला आणि वाळूवर त्यानं लिहिलं, “माझ्या जीवाभावाच्या मित्रानं आज माझ्यावर अकारण हात उचलला !”
त्या मित्रानं ती नोंद झालेली पाहिली. लक्षातही ठेवली. कोणी काहीच न बोलता ते दोघे पुढे चालत राहिले.
समोरून एक झरा झुळझुळत वाहत होतं. तिथं दोघं थांबले. थोडा वेळ विश्रांती घेतली. आणि अंघोळीसाठी पाण्यात उतरले. ज्या मित्रानं मघाशी मार खाल्ला होता, त्याचा नेमका पाय घसरला. तो पाण्यात पडला, गटांगळ्या खावू लागला. नाकातोंडात पाणी जायला लागलं. पण तितक्यात त्याचा मित्र मदतीला धावला. त्यानं स्वताचा जीव धोक्यात घालून त्याला वाचवलं. पाण्याबाहेर काढलं.
कसाबसा वाचलेला हा मित्र धापा टाकत श्वास घ्यायला लागलं. जरा वेळ शांत बसला. आणि तेवढ्यात त्याला समोर काळा कुळकुळीत दगड दिसला. त्यानं त्या दगडावर काही अक्षरं कोरायला सुरुवात केली.
त्यानं लिहिलं...
“आज माझ्या मित्रानं माझा जीव वाचवलं...मी आहे तो केवळ त्याच्यामुळे !”
दुसरा मित्र ते वाचून हादरतोच. म्हणतो, “तू हे काय करतोय मला कळत नाही. हे असं तू का लिहितो आहेस ? मघाशी मी तुला मारलं तर तू ते वाळूवर लिहिलंस आणि आत्ता दगडावर. असं का?”
तो उत्तर देतो, “यालाच मैत्री म्हणतात. आपल्या मित्रानं आपलं मन दुखावलं, आपल्याला त्रास दिला तर ते असं हलक्या हातानं वाळूवर लिहिल्यासारखं करावं. काळाची लाट येते आणि ती अक्षरं पुसून जातात. आपल्या मनात काहीच राहत नाही. मित्राविषयी मनात आपण अढी ठेवत नाही. पण मित्रानं जर आपल्यासाठी काही केलं तर ते कायम मनात जपून ठेवायला हवं. आपल्या आयुष्याची खरी पुंजी म्हणून जपायला हवं, असं मला वाटतं. हेच बघ ना, तू मला मारलंस त्याहीपेक्षा महत्वाचं आहे ते तू स्वताचा जीव धोक्यात घालून मला वाचवलंस ते !”
-       मैत्री अशीच तर असते. वाळू आणि दगडावर कोरलेल्या अक्षरासारखी. काय वाळूवर लिहायचं आणि काय दगडावर कोरायचं हे शेवटी आपल्यालाच ठरवायला हवं !

दैनिक लोकमतच्या मैत्र पुरवणीतून साभार. 
 

1 टिप्पणी(ण्या):

manu म्हणाले...

फारच मस्त, प्रकाश..... थेट काळजाला भिडणारी हि मैत्रीची कथा...आवडली आपल्याला ....धन्यवाद !!

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes