शनिवार, जानेवारी ०१, २०११

बा ! बहुजन समाजा, आपल्याच मुळांना विसरणारा शेंडा होवू नकोस !

डॉ. आ. ह. साळुंखे सर
झाडाचा शेंडा आकाशात उंच उंच झेपावत असतो. वाऱ्याच्या तालावर डुलत असतो. त्याला कोवळी पालवी फुटत असते. एकेकाळी त्याच्या समपातळीवर असलेले असंख्य पदार्थ आता खूप खाली राहिलेले असतात. अशा स्थितीत जमिनीच्या उदरात अदृश्य बनलेली स्वताची मूळे त्याला दिसण्याचा तर प्रश्नच नसतो. शिवाय माथ्यावरील आकाशाकडे नजर लागलेली असल्यामुळे आपल्यापेक्षा खूप खालच्या स्तरावर असलेल्या आपल्या मुळांकडे पाहायला सवड नाही, असेही काही झाडांच्या शेंड्यांना वाटत असते. खाली डोकावून पाहणे कधी कधी त्यांना अप्रतीष्ठेचेही वाटते.
बळीवंश- डॉ. आ. ह. साळुंखे यांचा गाजलेला ग्रंथ

अशा प्रकारचा शेंडा आपल्या उत्तुंग भरारीच्या नशेत एक गोष्ट मात्र विसरलेला असतो. आपली भरारी, आपले देखणे रूप, आपली कोवळी काया, आपले अवघे लावण्य त्या मुळांकडूनच आलेल्या अन्नारसावर अवलंबून असते, याचे भान त्याला राहिलेले नसते. ती मूळे बाहेरून जरी नजरेला दिसत नसली, तरी त्याला ताजे टवटवीत रूप देणारा अन्नरस त्या मुळांकडूनच आलेला असतो. पण याची जाणीव असण्यासाठी आवश्यक असलेली त्याची संवेदनशीलता करपून गेलेली असते.

बहुजन समाजाच्या दृष्टीने "बळीवंश" आणि त्याच्या प्रवाहातील असंख्य असुर व्यक्ती जमिनीत अदृश्य असलेल्या या मुळांसारख्या आहेत. बा ! बहुजन समाजा, तुला एकच प्रार्थना- आपल्याच मुळांना विसरणारा शेंडा होवू नकोस ! तू मुळांना नाकारलेस, त्यांना झिडकारलेस, त्यांच्याबरोबरचे नाते तोडून टाकलेस, तर तुझे असणे आणि नसणे सारखेच होईल.

धर्मशास्त्राचे गाढे अभ्यासक  डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या सुप्रसिद्ध  "बळीवंश" या ग्रंथातील उतारा.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes