शनिवार, जानेवारी ०१, २०११

परिवर्तनवादी साताऱ्यात आज संपन्न होणार पहिला "शिवविवाह"

दै. पुढारीतील (01/01/2011) ही बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
सातारा जिल्हा हा सुरवातीपासूनच परिवर्तनवादी आणि पुरोगामी विचारांच्या पाठीशी राहिला आहे. कारण स्वराज्य निर्माण करून सामाजिक आणि राजकीय अस्थिरता संपवण्याचा प्रयत्न करणारे  छ. शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली हि भूमी.
बहुजन समाजाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी अविरत झटणारे महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले हे दाम्पत्य साताऱ्याचेच. राजर्षी शाहूंच्या आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मानणारी भूमी. छत्रपती शिवाजी महाराजांची मुख्य गादीही साताऱ्याचीच. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था स्थापन केली, तिचा प्रसार केला तोही साताऱ्यातच. याच साताऱ्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकार स्थापन झाले होते. भारताला स्वातंत्र्य मिळायच्या ५-६ वर्षे आधी क्रांतीसिन्हानी साताऱ्याच्या जनतेला स्वातंत्र्य बहाल केले होते. विद्रोही सांस्कृतिक चळवळ असो व अंधश्रद्धा निर्मुलन समिती असो, या सर्व संघटनांना भक्कम पाठबळ दिले ते सातारकरानीच. डॉ. आ. ह. साळुखे सरांनी आपली प्रखर लेखणी चालवली तीही सातारच्याच मातीतून. या साताऱ्याने अनेक परिवर्तनवादी चळवळी पहिल्या, त्यांना पाठबळ दिले. एकेकाळी शेतकरी कामगार पक्षाला साताऱ्यात मोठा जनाधार असायचा, कारण महात्मा फुलेंच्या सत्यशोधक विचाराने प्रेरित झालेल्या बहुजन समाजातील लोकांनी तो पक्ष स्थापन केला होता. फुले-शाहू-आंबेडकरी चळवळी  साताऱ्यात मोठ्या प्रमाणात वाढल्या. साताऱ्याची मानसं  विचाराने पुरोगामी. त्यामुळेच साताऱ्यात प्रतिगामी शक्ती किंवा तथाकथित हिंदुत्ववाद्यांची डाळ कधी शिजली नाही. सातारा ही भूमी कधीही मनुवाद्यांच्या नादाला लागणारी नाही किंवा त्यांच्या षडयंत्राला भूलणारी नाही. 

आज साताऱ्यात पहिला "शिवविवाह" सोहळा संपन्न होत आहे. परिवर्तनवादी साताऱ्याने अनेक सत्यशोधक विवाह पाहिलेत. कोणताही ब्राम्हण पुरोहित न बोलावता आणि प्रचलित, पारंपारिक पद्धतीने (वैदिक पद्धतीने) लग्न सोहळा न करता बहुजन महामानवांचे स्मरण करून हा विवाह सोहळा केला जातो.

निनाम पाडळी, ता. सातारा येथील  मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड चे कार्यकर्ते नंदकुमार ढाणे यांची संगणक अभियंता असलेली कन्या  नम्रता आणि पुणे येथील दिलीप पाटील यांचे संगणक अभियंता असलेले चिरंजीव मयुरेश यांचा विवाह आज "शिवविवाह" पद्धतीने साजरा होत आहे. पुरोगामी साताऱ्याचे हे भाग्यच म्हणावे लागेल. चळवळीत केवळ काम करून किंवा विचार मांडून बहुजनांची प्रगती होणार नाही तर महामानवांचे विचार प्रत्यक्षात अमलात आणले तरच बहुजन समाज गुलामगिरी, अज्ञान, दारिद्र्य यांच्या जोखडातून मुक्त होईल. यापुढेही बहुजन समाजातील लोकांनी लग्न करताना या गोष्टींचा प्रामुख्याने विचार केला पाहिजे. शिवविवाह आदर्श विवाह अशासाठी आहे कि यामध्ये पारंपारिक आणि अन्यायकारक गोष्टीना फाटा देवून विवाह म्हणजे दोन मनांचे, दोन जीवांचे, दोन  संस्कृत्यांचे  मिलन आहे असा संदेश शिवविवाहाच्या निमित्ताने  देण्यात येतो. जन्म कुंडली, नक्षत्र, मंगळ इ. फालतू गोष्टीना यात पूर्णपणे दुर्लक्षण्यात आले आहे. मुलगा आणि मुलगी यांचे शिक्षण, संस्कार, सामाजिक जाणीव या गोष्टी प्रामुख्याने महत्वाच्या मानून शिवविवाह केला जातो. अवास्तव खर्च टाळून सामाजिक जबाबदारी म्हणून गोरगरीब, अनाथ मुले, किंवा उपेक्षितांच्या शिक्षण, रोजगार, आरोग्य यासाठी प्रयत्न करणाऱ्या संस्थाना वधू आणि वर यांच्याकडून काही मदत देण्यात येते. आपण समाजात जन्म घेतला म्हणजे आपलीही काहीतरी सामाजिक जबाबदारी आहे हे भान शिवविवाहात राखले जाते. त्यामुळे "शिवविवाह" हा आदर्श विवाह आहे. बहुजन समाजातील लोकांनी याकडे गांभीर्याने लक्ष देवून समाजात असे "शिवविवाह" घडवून आणावेत.

आज साताऱ्याच्या परिवर्तनवादी मातीत हा आदर्श शिवविवाह संपन्न होत आहे हे साताऱ्याचे परमभाग्यच म्हणावे लागेल.

1 टिप्पणी(ण्या):

Bhanudas Rawade म्हणाले...

वा उपक्रम अतिशय नावाजन्या सारखा आहे
पारंपारिक भुरसटले पना सोडून कमी खर्चा मधे हां विवाह पार पडतो आहे

पण बहुजनवाद अजूनही भिनला आहे अस दिसत नाही
कारण वधु आणि वर दोघेही मराठा आहेत
मला वाटल होत की ब्रिगेड चे धडाडी चे कार्यकर्ते ज़रा एडवांस असतील
अंतर्जातीय विवाह करुण समाजाला खरा बहुजनवाद शिकवतील
पण लग्न करताना बहुजनवाद फ़क्त मराठा मराठा असा होत असावा

ब्रिगेड च्या कार्यक्रत्यानि लग्न करताना समाजाला सन्देश देण्याची मार्गदर्शन करण्याची गरज आहे

जेंव्हा ब्रिगेड चे कार्यकर्ते BC OBC ST NT आशा जाती मधील मुलिं बरोबर लग्न करतील किंवा ह्या समाजा च्या मुलांना मराठा समाजा मधील मूली देतील तेंव्हा आपोआप सगळी जाती व्यवस्था मोडून पडेल

नाही तर तुमच्या बहुजनवादा च्या ह्या फ़क्त गप्पा आहेत हे सिद्ध होईल

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes