बुधवार, डिसेंबर २९, २०१०

दादोजी कोंडदेव पुतळा प्रकरणी प्रसारमाध्यमांचा पक्षपातीपणा

दादोजी कोंडदेव प्रकरणात प्रसारमाध्यमांनी जी भूमिका बजावली ती पाहून निपक्षपाती पत्रकारिता काय असते याची नवीन व्याख्या करावी लागणार आहे. कारण दादोजी कोंडदेव प्रकरणी प्रसारमाध्यमांनी ज्या प्रकारे बातम्या दिल्या ते पाहता कोणताही माणूस त्यांच्याकडून निपक्षपातीपणाची आणि न्यायाची अपेक्षा करणार नाही. दादोजी कोंडदेव यांच्या पुतळ्याला विरोध असण्याची दोन कारणे प्रसारमाध्यमांनी शोधून काढली आहेत.
  १.       दादोजी कोंडदेव ब्राम्हण असल्याने त्यांच्या पुतळ्याला विरोध केला जात आहे. म्हणजेच या मागे जातीयवाद आहे.
  २.      दादोजी कोंडदेव यांच्या पुतळ्याला विरोध हे राजकारण आहे. आणि अप्रत्यक्षपणे कोंग्रेस आणि राष्ट्रवादी हे राजकारण मतासाठी करत आहे.
यापैकी पहिल्या मुद्द्याचा परामर्श आपण या लेखात घेतलाच आहे. आता दुसऱ्या मुद्द्याकडे वाळू. दादोजी कोंडदेव पुतळ्याला विरोध यामागे कोंग्रेस आणि राष्ट्रवादी चे काही षडयंत्र आहे का ? मुळात दादोजी कोंडदेव हे शिवरायांचे गुरु नाहीत हे सिद्ध होताच बहुजन संघटनांनी हा वादग्रस्त पुतळा काढण्यासाठी आंदोलन चालू केले. यात शंभरभर शिवप्रेमी व बहुजनवादी संघटना सामील झाल्या होत्या. गेले ५-७ वर्षे बहुजनांचे हे आंदोलन चालू आहे. त्या आंदोलनाने यावर्षी उग्र रूप धारण केले आणि संघटनात्मक पातळीवर बहुजन रस्त्यावर आले. माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील आणि पी. बी. सावंत यांच्या लोकशासन मंचने त्यासाठी पुणे महापालिकेसमोर धरणे धरले. नगरसेवकांना अडवून ठेवून या प्रश्नाकडे लक्ष द्यायला भाग पडले. त्यानंतर २४ ऑक्टोबरला संभाजी ब्रिगेड आणि भारत मुक्ती मोर्चा यांनी संयुक्त संघर्ष मेळावा आयोजित करून सुमारे तीन लाख लोकांच्या साक्षीने ३१ डिसेंबर ही तारीख पालिकेला पुतळा हटवण्यासाठी दिली. जनमताचा कौल आणि इतिहासातील पुरावे पाहून महापौर ही पुतळा काढायच्या बाजूने होते. पण परत राजकारण असल्याचा आरोप झाला आणि काही काळासाठी हा मुद्दा बाजूला पडला. नंतर २३ डिसेम्बर ला पालिकेत बहुमताने दादोजी कोंडदेव यांचा पुतळा काढण्याच्या बाजुने ठराव केला गेला. या ठरावावेळी कोंग्रेस आणि राष्ट्रवादी ने ठरावाच्या बाजूने तर भाजप-सेना-मनसे यांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले. परंतु ठराव मंजूर झाला आणि सदर वादग्रस्त पुतळा हटवण्याचा मार्ग मोकळा झाला. पुतळा हटवला खरा पण त्याचे खापर कोंग्रेस आणि राष्ट्रवादीवर फोडून त्याचे राजकारण केले तर आपल्यालाही त्याचा फायदा होऊ शकतो हे ओळखलेल्या भाजप-सेना-मनसे ने हे जातीयवादी राजकारण असल्याची टीका सुरु केली. आणि प्रसारमाध्यमांनी त्यात अधिक भर घातली. कारण दादोजी कोंडदेव पुतळ्या संदर्भात कोणतीही बातमी दाखवताना “पुतळ्याचे राजकारण” अशा पद्दतीने मांडणी केली गेली. इतिहासातील पुरावे ना भाजप-सेना-मनसेने समजून घेतले, ना प्रसारमाध्यमांनी समजून घेतले. उठ कि सुठ बहुजनावर जातीवाद आणि राजकारण यांचा आरोप केला की आपली पोळी भाजत येते. त्याचा राजकीय पक्षांना तर फायदा होतोच पण न्यूज चेनेलवाल्यांचा टी. आर. पी. वाढतो आणि टी. आर. पी. वाढवण्यासाठी ते कोणत्या थराला जातील ते सर्वाना माहित आहे. त्यामुळे केवळ स्वार्थासाठी बहुजनांच्या आंदोलनाला जातीय आणि राजकीय स्वरूप देण्याचा हिडीस प्रकार प्रसारमाध्यमांनी केला. यात त्यांचा जो फायदा व्हायचा तो होऊ दे, परंतु बहुजन समाजाने मात्र अशा प्रसारमाध्यमांना ओळखून असावे.

1 टिप्पणी(ण्या):

मधुकर म्हणाले...

मित्रा,
एकदम जबरी. आवडलं.
असाच लिहत जा.

टिप्पणी पोस्ट करा

सह्याद्री बाणाला भेट दिल्याबद्दल आभारी आहे. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना महत्वाच्या आहे. कृपया खाली प्रतिक्रिया द्याव्या.

-प्रकाश पोळ

.

.

 
Design by Wordpress Theme | Bloggerized by Free Blogger Templates | coupon codes